आधी गद्दारीचा आरोप, आता भाजपच्या निवडणूक प्रमुखांची घोषणा; शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता
By संजय पाठक | Updated: June 9, 2023 15:00 IST2023-06-09T14:58:45+5:302023-06-09T15:00:44+5:30
या पाठोपाठच आता निवडणूक प्रमुखांची घोषणा झाल्याने, शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.

आधी गद्दारीचा आरोप, आता भाजपच्या निवडणूक प्रमुखांची घोषणा; शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता
नाशिक : भाजप नेते तथा माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या समर्थकांनी शिवसेना (शिंदे गट) खासदार हेमंत गोडसे गद्दार असल्याचे म्हणत त्यांच्यासंदर्भात पत्रके वाटली होती. या पाठोपाठच आता निवडणूक प्रमुखांची घोषणा झाल्याने, शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.
राज्यातील सर्व निवडणुका या पुढे एकत्रित लढविण्याची घोषणा सेना-भाजपने केली असली तरी भाजपने सर्वच स्तरांवर संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. एवढेच नाही, तर आता लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रमुखदेखील नियुक्त केले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी (दि. ८) निवडणूक प्रमुखांची घोषणा केली. यात नाशिक लोकसभेची जबाबदारी नाशिक भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर सोपविली आहे. याशिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख नियुक्त केले आहेत. भाजपच्या या नियुक्तीनंतर नाशिक शिवसेनेत मात्र अस्वस्थता आहे.
सध्या नाशिकचे खासदार हेमंत गोडसे असून, ते शिंदे गटाचे आहेत तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार या खासदार आहेत. मध्यंतरी भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली असल्याचे सांगितले होते. त्यांच्या फॅन्सनी केलेल्या सोशल मीडिया ग्रुपवरही गोडसेंना ‘टार्गेट’ केले जात आहे.