निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ‘बॉर्डर विंग’चे जवान तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:17 AM2019-10-22T00:17:42+5:302019-10-22T00:18:11+5:30
विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी यंदा पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने ‘बॉर्डर विंग’ म्हणजेच सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांची मदत घेतली असून, नाशिक शहरातील संवेदनशील मतदान केंद्राची जबाबदारी या जवानांवर सोपविण्यात आली आहे.
नाशिक : विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी यंदा पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने ‘बॉर्डर विंग’ म्हणजेच सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांची मदत घेतली असून, नाशिक शहरातील संवेदनशील मतदान केंद्राची जबाबदारी या जवानांवर सोपविण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून नाशकात दाखल झालेल्या या जवानांकडून प्रत्येक मतदान केंद्राची रेकी करण्यात येऊन तसा बंदोबस्ताचा आराखडा तयार करण्यात आला.
भारत-पाकिस्तानच्या गुजरात नजीकच्या सीमेवर तैनात असलेल्या बॉर्डर विंगच्या सुमारे १७०० जवानांची यंदा पहिल्यांदाच महाराष्टÑाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मदत घेण्यात आली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या राज्यातील काही ठराविक मतदारसंघातच या जवानांना तैनात करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेऊन बंदोबस्ताची रूपरेषा ठरविली होती. नाशिक शहरात बॉर्डर विंगचे तीनशे जवान तैनात करण्यात आले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या जवानांचे नाशकात आगमन झाले असून, संवेदनशील मतदान केंद्रावर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.