पहिलीच वेळ : शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी कायम
By admin | Published: August 7, 2016 12:30 AM2016-08-07T00:30:34+5:302016-08-07T00:31:21+5:30
सर्व धरणांतून विसर्ग
नाशिक : पावसाने जिल्ह्यात शनिवारी हजेरी कायम ठेवल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच २३ धरणांपैकी १९ धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपावेतो ३५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी ८ वाजेपावेतो ५६९ मिलिमीटर म्हणजेच सरासरी ३७ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने तो खरा ठरत रात्रीपासून सुरू झालेला पाऊस दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. परिणामी सूर्यदर्शनदेखील होऊ शकले नाही. पावसाचा जोर अधिक असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक शाळांनी पावसाचा जोर पाहून सुटी जाहीर करून टाकली. पावसाचा जोर वाढत असल्याचे पाहून सकाळी १० वाजेनंतर गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. दहा वाजता १२,७०८ क्यूसेक असलेले पाणी व त्यात धरणाच्या खालच्या बाजूने गोदावरीला येऊन मिळणाऱ्या नाल्यांमुळे हाच विसर्ग रामकुंडाजवळ १४,१९० क्यूसेकपर्यंत पोहोचल्याने पुन्हा गोदावरीच्या पुराची पातळी वाढली. टप्प्याटप्प्याने धरणातून विसर्गात वाढ करण्यात आल्यानंतर दुपारी रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीही पूर्णपणे पाण्यात बुडाला. परंतु मंगळवारच्या पुरामुळे अगोदरच सावध असलेल्या गोदाकाठच्या नागरिकांचे शनिवारच्या पुरात नुकसान टळले.
धरणांचे दरवाजे उघडले
यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे सर्वच धरणांच्या साठ्यांमध्ये वाढ झाली आहे. अपवाद गिरणा धरणाचा असून, ते ३५ टक्केच भरले आहे. २३ लहान-मोठ्या धरणांमध्ये ६६ टक्के साठा झाला आहे. शनिवारी गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी, पालखेड, करंजवण, वाघाड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, कडवा, आळंदी, भोजापूर, चणकापूर, पूनद, हरणबारी, केळझर, ठेंगोडा या १९ धरणांमधून नद्यांमध्ये पाणी सोडण्यात आले. दशकात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्वच धरणांमधून एकाच वेळी पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांनी सांगितले.