पंधरा वर्षांनंतर प्रथमच घडले ‘पांढऱ्या चक्रवाक’चे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:36 AM2021-02-05T05:36:07+5:302021-02-05T05:36:07+5:30
--- अझहर शेख, नाशिक : पाणथळ दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि.१) गंगापूर धरणाच्या जलाशयावर विदेशी स्थलांतरित बदकाच्या प्रजातींपैकी एक असलेल्या ...
---
अझहर शेख,
नाशिक : पाणथळ दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि.१) गंगापूर धरणाच्या जलाशयावर विदेशी स्थलांतरित बदकाच्या प्रजातींपैकी एक असलेल्या ‘कॉमन शेल डक’ (पांढरा चक्रवाक) या भारतात अत्यंत दुर्मीळ असलेल्या पाणथळी पक्ष्याने पंधरा वर्षांनंतर प्रथमच नाशकात दर्शन दिले. हा पाहुणा थेट युरोपमधून नाशकात दाखल झाला असल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या स्थलांतरित पक्षी शास्त्रज्ञ तुहिना कट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
युरोपमधील स्थानिक स्थलांतरित पक्षी म्हणून ओळखलला जाणारा पांढरा चक्रवाक या बदकाचे भारतात क्वचितच दर्शन घडते. हा पक्षी नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यासारख्या स्थलांतरित पक्ष्यांचे पक्षितीर्थ असलेल्या पाणथळ जागेवरही अजून पहावयास मिळालेला नाही. हजारो किलोमीटरचा प्रवास करून पक्ष्यांच्या मध्य आशियाई उड्डाणमार्गातील महत्त्वाचे विश्रांतीस्थळ असलेल्या नाशिकमधील गंगापूर धरणाच्या जलाशयावर या पक्ष्याने दर्शन दिले. तुहिना कट्टी यांनी हा पक्षी सर्वप्रथम ओळखला. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिकच्या पक्षी निरीक्षक प्रतीक्षा कोठुळे यांच्या पथकासोबत कट्टी यांनी सोमवारी गंगापूर धरण परिसराला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी येथील पक्षिजीवन व जैवविविधतेविषयी विविध निष्कर्ष नोंदविले. गंगापूर धरण क्षेत्राला २०१३ साली बर्डलाइफ इंटरनॅशनल व बीएनएचएसद्वारे ‘महत्त्वाचा पक्षी परिसर’ (इम्पॉर्टन्ट बर्ड एरिया) असा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे हे पाणथळ अत्यंत महत्त्वाचे व संवेदनशील असे ठिकाण असल्याचे त्यांनी सांगितले.
---इन्फो--
पांढरा चक्रवाक खूपच दुर्मीळ
युरोप खंडातून प्रवास करणारा पांढरा चक्रवाक हा पक्षी अत्यंत दुर्मीळ असाच आहे. या पक्ष्याचे दर्शन नाशकात पंधरा वर्षांनंतर घडले, हे शुभ वर्तमान मानले जात आहे. बदकांच्या जातीचा हा पक्षी पाणथळ जागेला आपल्या अधिवासाकरिता पसंती देतो. एनसीएसएनचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत बिश्वरुप राहा यांच्या ‘बर्डस ऑफ नाशिक’ या पुस्तकात पक्ष्याच्या दर्शनाची जुनी नोंद आढळून येते. या पक्ष्याची वीण युरोपमध्ये असल्याचे त्यामध्ये नमूद आहे.
--कोट--
नाशिक हे स्थलांतरी विदेशी पक्ष्यांच्या मध्य आशियाई मार्गामधील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. या शहरात धरणांची संख्या जास्त असल्यामुळे पाणपक्ष्यांकरिता उत्तम अशी कनेक्टिव्हिटी आहे. यामुळे आगमन आणि परतीच्या प्रवासात नाशिकच्या धरणांचा परिसर विदेशी पक्ष्यांना खूपच ऊर्जा प्रदान करत दिलासा देऊन जातो. नांदुरमध्यमेश्वर, गंगापूर, वाघाड यासारख्या धरणांमुळे येथील पक्षिजीवन समृध्द होत आहे.
- तुहीना कट्टी, पक्षीशास्त्रज्ञ, बीएनएचएस
--
फोटो आर वर ०१गंंगापूर डॅम नावाने.
===Photopath===
010221\01nsk_39_01022021_13.jpg
===Caption===
गंगापूर डॅममध्ये विहार करणारा पांढरा चक्रवाक बदक