सीमेंट कॉँक्रीटचे रस्ते असलेले जिल्ह्यातील पहिले गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:26 AM2020-01-12T00:26:50+5:302020-01-12T01:30:49+5:30
संजय दुनबळे । दिंडोरी तालुक्यातील अवनखेड या छोट्याशा गावात आज विकासाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ ...
संजय दुनबळे ।
दिंडोरी तालुक्यातील अवनखेड या छोट्याशा गावात आज विकासाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी येथील सरपंच प्रयत्नशील असून, वेगवेगळ्या योजनांचा गावाच्या विकासासाठी वापर केल्याने शहरात मिळणाऱ्या सुविधा गावात मिळत आहेत. येथील सरपंच नरेंद्र जाधव यांच्या नियोजपूर्वक आणि पारदर्शी कारभारातूनच हे शक्य झाले आहे. शासकीय योजना सर्व ठिकाणी सारख्याच असतात त्यांची जर प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली तर प्रत्येक गावात हे शक्य आहे. सरपंच नरेंद्र जाधव यांना यावर्षीचा राज्यस्तरीय लोकमत सरपंच आॅफ दि इयर पुरस्कार मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद...
आपल्या ग्रामपंचायतीने कोणती विशेष कामे केली आहेत ?
जाधव - दिंडोरी तालुक्यातील अवनखेड सारख्या २८०० लोकवस्तीच्या छोट्याशा गावात आम्ही प्रथम मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर भर दिला. पूर्वी गावात रस्तेही चांगले नव्हते. दळणवळणाच्या दृष्टीने ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. आज गावात सर्वत्र सीमेंट कॉँक्रीटचे रस्ते असून अंतर्गत रस्ते सीमेंट कॉँक्रीटचे असणारी तालुक्यातील आमची पहिली ग्रामपंचायत आहे. पूर्वी पाण्याची एकाच ठिकाणी सोय होती. महिलांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत होती. ग्रामपंचायतीचे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले. आज गावातील प्रत्येक घरासमोर पाणीपुरवठा योजनेचा नळ आहे. इतकेच नव्हे ग्रामपंचायतीने प्रत्येक घरासमोर एक छोटी मोरी बांधून दिली असून, महिलांची धुणे-भांड्याची सोय तेथेच करून दिली आहे. गावात सर्वत्र भूमिगत गटारी बांधण्यात आल्या असून, त्यातून वाहणारे सांडपाणी शोषखड्ड्यांमध्ये जिरवले आहे. त्यामुळे गावात कोठेही रस्त्यांवर सांडपाणी वाहताना दिसत नाही. यामुळे रोगराईचे प्रमाण कमी झाले आहे.
प्रश्न - ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या ?
जाधव - अवनखेड गाव परिसरात विविध कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांना सुरुवातीला कर आकारणी खूपच कमी होती. त्यात सुधारणा करून आता शासनाच्या नियमाप्रमाणे कंपन्यांकडून कर आकारणी केली जाते. प्रसंगी कंपन्यांवर जप्तीची कारवाई करून सक्तीने कर वसुली केली जात असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. त्यामाध्यमातून गावात विकासकामे करण्यास मदत होते.
प्रश्न - राज्यस्तरीय पुरस्काराबाबत काय सांगाल?
जाधव - २००५ साली मी गावचा सरपंच झालो. ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेतल्यानंतर मी पैसा खाणार नाही आणि खाऊ देणार नाही हे सूत्र अंगीकारले आहे. यामुळे गेल्या १५ वर्षांत मी प्रसिद्धीसाठी एकही पुरवणी कुठल्या वर्तमानपत्राला दिलेली नाही. असे असतानाही ‘लोकमत’ सारख्या मोठ्या दैनिकाने माझ्या कार्याची दखल घेऊन मला राज्यस्तरावर सरपंच आॅफ दि इयर पुरस्कार देऊन माझा सन्मान केला, हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे.
गावात प्राथमिक शाळेची इमारत बांधली आहे. इंग्लिश मीडियमसारखी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी ही इमारत असून, सीएसआर फंडातून शाळेसाठी एक बस घेतली आहे. श्रीमंतांप्रमाणेच आज गरीब विद्यार्थ्यांच्या दारातही शाळेची बस उभी राहाते. यामुळे दूरवरून शाळेत येणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. बस ना नफा ना तोटा तत्त्वावर चालविली जात असल्यामुळे या विद्यार्थ्यांकडून अल्प फी घेतली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांनाही परवडते. पूर्वी ३ ते ४ कि.मी.वरून विद्यार्थ्यांना पायी चालत शाळेत यावे लागत होते.