जिल्ह्यात पाण्याचा पहिला टॅँकर सुरू

By admin | Published: March 4, 2017 01:52 AM2017-03-04T01:52:39+5:302017-03-04T01:52:52+5:30

नाशिक : पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असताना प्रशासनाने टंचाई कृती कार्यक्रम राबविण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर मंजूर करण्यात भेदाभेद चालविला आहे

First water tanker to start in the district | जिल्ह्यात पाण्याचा पहिला टॅँकर सुरू

जिल्ह्यात पाण्याचा पहिला टॅँकर सुरू

Next


नाशिक : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा अलीकडे वाढला असला तरी, कमी पर्जन्यमान झालेल्या ग्रामीण भागात जानेवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असताना प्रशासनाने टंचाई कृती कार्यक्रम राबविण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर मंजूर करण्यात भेदाभेद चालविला आहे. दीड महिन्यापासून पाण्याची मागणी करणाऱ्यांना डावलून निव्वळ मंत्र्याच्या दबावापोटी मालेगाव तालुक्यातील दुंधे येथे दोनच दिवसांत टॅँकर मंजुरीचे आदेश काढण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्णात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी, काही तालुक्यांमधील विशिष्ट भागाकडे त्याची वक्रदृष्टी कायम होती. तथापि, नदी, नाले व धरणांमधील पाण्याचा साठा पाहता ज्या ठिकाणी कमी पर्जन्यवृष्टी झाली त्या ग्रामीण भागात डिसेंबरपर्यंत सर्व आलबेल होते. मात्र जानेवारी महिन्यापासून बागलाण तालुक्यातील खिरमाणे व सादरे या दोन गावांना भीषण पाणीटंचाई भेडसावू लागल्याने ग्रामपंचायतीने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव गट विकास अधिकारी तसेच तहसीलदारांना सादर केला. या दोन्ही कार्यालयाने पाणीटंचाईची खात्री करून तसा अहवाल प्रांत कार्यालयाला दिला व प्रांत कार्यालयाने टॅँकर मागणीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाला नोंदविली. परंतु जिल्ह्णात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही टॅँकरची मागणी कशी होऊ शकते, असा सवाल जिल्हा प्रशासनापुढे उभा राहिला परिणामी ज्या गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागली त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने पाणीटंचाईची खात्री करण्यासाठी थेट ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्याकडून अहवाल मागविला, त्यांनीही खिरमाणे, सादरे गावात पिण्याचा पाण्याचा कोणताही उद्भव नसल्याचे स्पष्ट केले असताना, प्रशासनाने त्यांच्यावरही अविश्वास दर्शवित, थेट भूजल सर्वेक्षण विभागाकडून संबंधित गावातील जमिनीखालील पाण्याचा अंदाज घेतला, त्यांनीही पातळी खोल गेल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर प्रशासनाचे समाधान झाले नाही. सरते शेवटी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे मत मागविण्यात आले, हे मतदेखील टॅँकरने पाणीपुरवठा करण्याच्या बाजूनेच स्पष्ट झाले. तथापि, अद्यापही या दोन गावांना टॅँकर मंजूर झाले नाहीत. बागलाण तालुक्यातील रामतीर, राहुड व इजमाने या तीन गावांनाही पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. परंतु त्यांच्याही तोंडाला पाणी पुसण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार बागलाण तालुक्यातील पाणीप्रश्नी केंद्रीय मंत्र्यांनीही प्रशासनाला अवगत करून पाण्याची मागणी केली असता, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

Web Title: First water tanker to start in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.