पहिले विश्व मराठी ऑनलाइन साहित्य संमेलन २८ पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 01:07 AM2021-01-25T01:07:41+5:302021-01-25T01:08:01+5:30
जगभरातील १२ कोटी मराठी भाषिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विश्व मराठी परिषदेने हे पहिले ऑनलाइन विश्व मराठी संमेलन आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. २८ ते ३१ जानेवारी असे चार दिवस हे संमेलन रंगणार आहे.
नाशिक : जगभरातील १२ कोटी मराठी भाषिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विश्व मराठी परिषदेने हे पहिले ऑनलाइन विश्व मराठी संमेलन आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. २८ ते ३१ जानेवारी असे चार दिवस हे संमेलन रंगणार आहे.
वैश्विक मराठी भाषिक समाजाचे स्वप्न बघणाऱ्या विश्व मराठी परिषदेतर्फे आयोजित या संमेलनात एक दिवसाच्या स्वतंत्र विश्व मराठी युवक संमेलनाचाही समावेश आहे. संमेलन सर्वांसाठी पूर्णतः निःशुल्क असून, वैश्विक स्तरावर होणारे हे असे पहिलेच मराठी ऑनलाइन संमेलन ठरेल. सुमित्राताई महाजन या संमेलनाच्या महास्वागताध्यक्ष असून उत्तर अमेरिकेतील सर्व महाराष्ट्र मंडळांची प्रातिनिधिक संस्था असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या अध्यक्ष विद्या जोशी या संमेलनाच्या महासंरक्षक असतील. संमेलनामध्ये प्रथमच ९ जणांचे अध्यक्षीय मंडळ राहणार आहे. डॉ. अनिल काकोडकर हे महासंमेलनाध्यक्ष राहणार आहेत. तर साहित्य विभागात भारत सासणे आणि डॉ. विनता कुलकर्णी, संस्कृती विभाग - सयाजी शिंदे आणि रश्मी गावंडे, फ्रँकफर्ट, उद्योजक विभाग - डॉ. प्रमोद चौधरी आणि मृणाल पंडित-कुलकर्णी, युवा विभाग - उमेश झिरपे आणि अजित रानडे हे संमेलनाध्यक्ष राहणार आहेत. संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून नि:शुल्क नोंदणी संकेतस्थळावर करण्याचे आवाहन विश्व मराठी परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. देश-विदेशातील मराठी भाषिकांनी या संमेलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले आणि संस्थापक संचालक अनिल कुलकर्णी यांनी केले आहे.
२५ देशांमध्ये स्वागताध्यक्ष
२५ देशांमधून २५ स्वागताध्यक्ष असून, लीना सोहनी या भारतातील स्वागताध्यक्ष आहेत. संमेलन आयोजक कार्यकारिणी ही ५१ जणांची असून, त्यात भारताबाहेरील विविध देशांतील २५, महाराष्ट्रातील १५ आणि भारतातील इतर राज्यांतील ११ व्यक्तींचा समावेश आहे. संमेलनामध्ये सुमारे ३२ देशांतील, अमेरिकेतून ४० राज्यांतील, भारतातील १२ राज्यांतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी भाषिक बांधव तसेच १५०हून अधिक संस्था, ५००हून अधिक वाचनालये आणि १००० हून अधिक महाविद्यालये सहभागी होणार आहेत.