बसचे ब्रेक निकामी झाल्याने पाच दुचाकींना धडक
By admin | Published: January 8, 2015 12:51 AM2015-01-08T00:51:44+5:302015-01-08T00:52:25+5:30
दत्तमंदिर येथील घटना : तिघेजण जखमी
नाशिकरोड : नाशिकरोडहून सातपूर शिवाजीनगरला जाणाऱ्या शहर वाहतुकीच्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने या बसने दुपारी दत्तमंदिर चौक सिग्नलवर उभ्या असलेल्या पाच मोटारसायकलना धडक दिली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. तीन जण मात्र जखमी झाले आहेत.
नाशिकरोडहून सातपूर शिवाजीनगरला जाण्यासाठी प्रवासी घेऊन शहर वाहतुकीची बस (एमएच १५ एके-८०८८) आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास निघाली. दत्तमंदिर चौक येथे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या सिग्नलवर डंपर (एमएच १८ एम ७०६२) व त्याच्या बाजूला ५-६ मोटारसायकली व काही गाड्या उभ्या होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या शहर वाहतुकीच्या बसचालकाने डंपरशेजारी उभ्या असलेल्या ३-४ मोटारसायकलींना पाठीमागून जोरदार धडक दिली. पाठीमागून अचानक मोठा आवाज करत धडक बसल्याने त्या मोटारसायकलवरील चालक व सहकारी खाली पडले, तर इतर वाहनधारकांना पहिले काही समजले नाही; मात्र त्या डंपरमुळे बस थांबल्याने मोठा अनर्थ टळला.
एसटी बसच्या अपघातात एम-८० (एमएच १५ एक्स-९९२४), हिरो होंडा (एमएच १५ बीपी-८२०८), कावासाकी बजाज (एमएच १५ बीई- २६३२) या तीन गाड्या बसच्या पुढे जाऊन एकमेकांवर पडल्या, तर अॅक्टिवा (एमएच १५ ईएम-१२४०), पॅशन प्रो (एमएच १५ डीएन-९०५९) या दोन गाड्या बसच्या धडकेने शेजारी उभ्या असलेल्या डंपरखाली जाऊन पडल्या. या मोटारसायकलवरील अनिता संजय शिंदे (३५), रा. डीजीपीनगर, पुप्पा रावसाहेब भागवत (५०), रावसाहेब भागवत (६६), रा. भोर मळा नाशिकरोड हे जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर बसचालक व वाहक हे घटनास्थळावरून पळून गेले. यानंतर समाजकंटकांनी बसच्या काचेवर दगडफेक केली. (प्रतिनिधी)