भाजपात प्रवेश करूनही पाच नगरसेवकांना ठेंगा !
By admin | Published: February 4, 2017 01:30 AM2017-02-04T01:30:45+5:302017-02-04T01:30:59+5:30
उमेदवारी वाटप : चौदा नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करत भाजपात दाखल झालेल्या पाच नगरसेवकांना भाजपाने उमेदवारी नाकारत ठेंगा दाखविला आहे. मात्र, पक्षबदलू १४ नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे, संबंधित नगरसेवकांच्या प्रभागात भाजपाला बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळविण्यासाठी सेना-भाजपात मोठ्या प्रमाणावर उड्या पडल्या. अनेक नगरसेवकांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत सेना-भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रामुख्याने, मनसेच्या नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी, वंदना शेवाळे, सुनीता मोटकरी, माधुरी जाधव, अर्चना थोरात, शशिकांत जाधव, सतीश सोनवणे, संगीता गायकवाड, सुदाम कोंबडे, रुची कुंभारकर, रेखा बेंडकुळे तसेच कॉँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे, लता पाटील, उद्धव निमसे, शिवसेनेच्या कोमल मेहरोलिया, अपक्ष पवन पवार व दामोदर मानकर याशिवाय स्वीकृत सदस्य हरिश लोणारी व सचिन महाजन यांनी प्रवेश केला होता.
या सर्व उमेदवारांना तिकिटे देण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिल्याचा दावा संबंधित नगरसेवकांनीच केला होता. शुक्रवारी (दि.३) भाजपाने आपल्या उमेदवारांची अंतिम यादी घोषित केली असता त्यात मनसेच्या वंदना शेवाळे व सुनीता मोटकरी तसेच अपक्ष पवन पवार, स्वीकृत सदस्य हरिश लोणारी व सचिन महाजन यांचा उमेदवारी वाटपात पत्ता कट केला आहे. पवन पवार यांनी मात्र अपक्ष म्हणून प्रभाग १८ मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांच्या विरोधात भाजपाने प्रा. शरद मोरे यांनी उमेदवारी दिली आहे. भाजपात दाखल झालेल्या उद्धव निमसे, रूची कुंभारकर, दामोदर मानकर, रेखा बेंडकुळे, शशिकांत जाधव, शिवाजी गांगुर्डे, माधुरी जाधव, अर्चना थोरात, कन्हैया साळवे, संगीता गायकवाड, कोमल मेहरोलिया, डॉ. दीपाली कुलकर्णी, सतीश सोनवणे व सुदाम कोंबडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या प्रभागात निष्ठावंतांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, बंडखोरीची शक्यता आहे. (प्रतिनिधी)