पाच दिवसांनी गुन्हा दाखल
By admin | Published: March 7, 2017 12:32 AM2017-03-07T00:32:40+5:302017-03-07T00:32:53+5:30
चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील ‘त्या’ तोतया डॉक्टरविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात तब्बल पाच दिवसांनंतर फिर्याद दाखल झाली.
चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील ‘त्या’ तोतया डॉक्टरविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात तब्बल पाच दिवसांनंतर फिर्याद दाखल झाली. उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि. १) वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून केसपेपरवर औषधे लिहून देणाऱ्या सीतारामनामक तोतया डॉक्टराविरोधात आरडाओरड झाल्यानंतरही गुन्हा दाखल झाला नाही. अखेर आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने तर्क-वितर्क व्यक्त होत आहे.
दि. १ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास डॉ. अभिजित नाईक रुग्णालयात आलेले नसताना एक रुग्ण इंजेक्शन घेण्यासाठी अधिपरिचारिका कल्पना गावित यांच्याकडे गेला असता, त्यांना केसपेपरवरील अक्षराबाबत शंका आल्याने त्यांनी बाह्यरुग्ण विभागात जाऊन पाहिले तर डॉ. नाईक यांच्या खुर्चीत अनोळखी व्यक्ती रुग्णांची तपासणी करून केसपेपरवर औषधे लिहून देत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत गावित यांनी सदर व्यक्तीस विचारणा केली असता, डॉ. नाईक यांनी ते येईपर्यंत रुग्ण तपासणीसाठी मला पाठविले आहे, असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर सदर घटनेची माहिती अधिपरिचारिका गावित यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे यांना दिली. या कालावधीत रुग्णालयात गर्दी झाल्याने गर्दीचा फायदा घेऊन तो तोतया सीताराम फरार झाला, तर सीतारामनामक व्यक्ती भरवीर, ता. चांदवड येथील असल्याचे समजले. याबाबत कल्पना गावित यांनी या अज्ञात व्यक्तीविरोधात अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहिते करीत आहेत. मात्र या उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून उपजिल्हा रुग्णालयातील कारभार भोंगळ असल्याचा अनुभव आला. जागरूक नागरिकांनी सदरचा प्रकार उघडकीस आणला व प्रशासन साधी गुन्हा दाखल करण्यासाठी सुमारे पाच दिवसाचा वेळ खातो यावरून तोतया डॉ. सीतारामला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वरदहस्तच असल्याचे अनेकांनी यापूर्वी बोलून दाखविले आहे. (वार्ताहर)