पाच दिवसांनंतर नाशिक-संभाजीनगर बसेस धावल्या
By Sandeep.bhalerao | Published: November 3, 2023 04:52 PM2023-11-03T16:52:03+5:302023-11-03T16:52:31+5:30
नाशिक आगारातून दररोज १३ बसेस संभाजीनगरसाठी सोडल्या जातात तसेच दोन बसेस या बाहेरील आगाराच्या संभाजीनरकडे धावतात.
नाशिक: राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे काही मार्गांवर थांबविण्यात आलेल्या बसेस शुक्रवार (दि.३) पासून पूर्ववत सुरू झाल्या आहेत. त्यानुसार नाशिक-संभाजीनगर मार्गावर बंद करण्यात आलेल्या नाशिक आगाराच्या बसेस पुन्हा धावण्यास सुरुवात झाली. गेल्या २९ ऑक्टोबरपासून या बसेस बंद असल्याने महामंडळाला आर्थिक फटकादेखील सहन करावा लागला. राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदाेलक आक्रमक झाल्यामुळे अनेक मार्गावरील बसेस खबरदारीचा उपाय म्हणून रद्द करण्यात आल्या होत्या. पोलिस प्रशासनाकडूनदेखील याबाबतची खबरदारी घेण्याची सूचना महामंडळाला केली होती. त्यानुसार गेल्या २९ तारखेपासून संभाजीनगर मार्गावरील बसेस बंद करण्यात आल्या होत्या. बसेसचे नुकसान होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु आता आंदोलन मागे घेण्यात आल्याने बसेसदेखील पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.
नाशिक आगारातून दररोज १३ बसेस संभाजीनगरसाठी सोडल्या जातात तसेच दोन बसेस या बाहेरील आगाराच्या संभाजीनरकडे धावतात. आंदोलन काळात बंद करण्यात आलेल्या बसेस शुक्रवारी सुरू झाल्याने सकाळी पहिली बस संभाजीनगरकडे रवाना झाली. या मार्गावर महामंडळाला चांगले उत्पन्न मिळते. साधारणपणे दैनंदिन आठ लाखांचे उत्पन्न मिळत असल्याने गेल्या पाच दिवसात ४० लाखांचे नुकसान महामंडळाला सोसावे लागले.
खबरदारीचा उपाय म्हणून या बसेस तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलेल्या होत्या. संभाजीनगर किंवा नाशिक मार्गावर कोणत्याही प्रकारच्या बसेसच नुकसान झालेले नव्हते मात्र संभाजीनगरला अचानक बसेस बंद करण्याची वेळ आल्याने नाशिकहून जाणाऱ्या बसेसदेखील थांबविण्यात आल्या होत्या. त्यानुसार संभाजीनगरच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या होत्या. बसेस सुरू होण्यासाठी तब्बल पाच दिवसांची प्रतीक्षा महामंडळाला करावी लागली.