पाच दिवसांचे बाळ सोडले वाऱ्यावर
By admin | Published: March 10, 2017 01:58 AM2017-03-10T01:58:21+5:302017-03-10T01:58:32+5:30
नाशिक : पाच दिवसांचे बाळ वाऱ्यावर सोडून जिल्हा रुग्णालयातून एका निर्दयी मातेने पळ काढल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
नाशिक : पाच दिवसांचे बाळ वाऱ्यावर सोडून जिल्हा रुग्णालयातून एका निर्दयी मातेने पळ काढल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
एक अविवाहित गर्भवती महिला प्रसूतीपूर्व वेदना होऊ लागल्याने गेल्या शनिवारी (दि.४) जिल्हा रुग्णालयात पोहचली होती. रुग्णालयातील प्रसूती विभागात डॉक्टरांनी तपासणी करून तिला प्रसूतीसाठी दाखल करून घेतले. रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास त्या महिलेची शस्त्रक्रियेच्या आधारे प्रसूती करण्यात आली. महिलेने एका पुरुष लिंगाच्या बाळाला जन्म दिला. बाळाचे वजन दोन किलो असले तरीदेखील त्याची प्रकृती अस्वस्थ असल्याने डॉक्टरांनी बाळाला वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ एनआयसीयू कक्षात हलविले आहे. दरम्यान, या बाळाला जन्म देणाऱ्या अविवाहित महिलेने प्रसूती कक्षात एखाद्या मनोरुग्णाप्रमाणे वर्तन सुरू केले. त्यामुळे रुग्णालयातील अन्य रुग्णांनाही त्याचा त्रास होऊ लागला होता.
यावेळी डॉक्टरांनी या महिलेची समजूत काढून तिला शांत राहण्याचा सल्ला देत त्या महिलेला प्रसूतीनंतरच्या औषधोपचारही केला. अखेर या महिलेने गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास गोंधळ घालून बाळाला मला कुठल्याही परिस्थितीत सोपवा, असा हट्ट धरला; मात्र बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने बाळाला देता येणार नसल्याचे डॉक्टरांनी या मातेला सांगितले. यानंतर माता रुग्णालयातील कक्षात न थांबता बाळाची कोणतीही काळजी न करता थेट बाहेर पळून गेली. (प्रतिनिधी)