आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी
By admin | Published: May 8, 2017 12:56 AM2017-05-08T00:56:15+5:302017-05-08T00:56:58+5:30
चांदवड : न्हनावे येथे विवाहितेने तिच्या चार महिन्यांच्या मुलासह स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याप्रकरणी सासरकडील नातेवाइकांना ताब्यत घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : तालुक्यातील न्हनावे येथे २५वर्षीय विवाहितेने तिच्या चार महिन्यांच्या मुलासह स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी सासरकडील नातेवाइकांना ताब्यत घेतले आहे.
मृत विवाहितेच्या वडिलांनी पती, सासरे, सासू व इतर पाच असे सात सासरच्या मंडळींच्या सात्राला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद दिल्याने चांदवड पोलिसांनी पती, सासरे, सासू यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्या सर्व संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सासरच्या त्रासाला कंटाळल्याची तक्रार नेहमीच अर्चना करीत असे. दरवेळी समजूत काढून तिला नांदण्यास पाठवून देत असे. त्यानंतरही सासरच्यांकडून सातत्याने त्रास होत असल्याने अर्चना (२५) हिने व मुलगा प्रणयसह (४ महिने) शुक्रवारी (दि. ५ ) सकाळी अहेरवस्ती येथील सासरी स्वत:ला पेटून घेत आत्महत्या केली, अशी फिर्याद वडिलांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, जमादार पी. एन. खैरनार, नरेश सैंदाणे, मंगेश डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गणूर येथील विवाहितेच्या माहेरची मंडळी व सासरकडील मंडळींमध्ये वाद सुरू होता. पोलीस निरीक्षक मोहिते यांनी समजूत काढून वावाहितेचे शव विच्छेदनासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले. उत्तरीय तपासणीनंतर सासरीच अंत्यसंस्कार करण्याचा पवित्रा माहेरच्या मंडळींनी घेतला.पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र ते कोणाचेही ऐकत नव्हते. रात्री ९ वाजेच्या सुमारास सासरी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संतप्त नागरिकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी जादा कुमक मागविली होती. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक भारती, जमादार पी.एन. खैरनार हे तपास करीत आहेत. घटनास्थळी मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ.राहुल खाडे यांनी भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले.