पाच महामार्ग महापालिकेच्या ताब्यात
By admin | Published: April 8, 2017 12:53 AM2017-04-08T00:53:16+5:302017-04-08T00:56:08+5:30
नाशिक : नाशिक महापालिकेकडे शहरातील पाच प्रमुख राज्यमार्ग यापूर्वीच वर्ग झालेले असल्याचा दावा जिल्हा बार व रेस्टॉरंट असोसिएशनने (आभार) केला आहे
नाशिक : नाशिक महापालिकेकडे शहरातील पाच प्रमुख राज्यमार्ग यापूर्वीच वर्ग झालेले असल्याचा दावा नाशिक जिल्हा बार व रेस्टॉरंट असोसिएशनने (आभार) केला असून, त्याबाबतचे पुरावेच त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून या पाच मार्गावरील मद्य विक्रीची दुकाने तत्काळ सुरू करण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या पाचशे मीटर अंतरावर असलेले बिअर बार, परमिट रूम, वाइन शॉप, बिअर शॉपी, देशी दारू अशा सर्व प्रकारची मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यातील ७९० दुकाने बंद झाली आहेत. तथापि, नाशिक शहरातून जात असलेल्या राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे यापूर्वीच नाशिक महापालिकेकडे हस्तांतरण झाले असून, त्यात नाशिक-पुणे हा ९.६५ किलोमीटर, नाशिक-पेठ हा ११.६० किलोमीटर, नाशिक-निफाड हा ५.४० किलोमीटर, नाशिक-दिंडोरी हा १०.७५ किलोमीटर, डहाणू-त्र्यंबक-नाशिक हा १६.२० किलोमीटर, आडगाव, गिरणारे, वाघेरा, हरसूल हा ५.६०० किलोमीटर रस्त्याचा समावेश आहे. नाशिक महापालिकेकडे या रस्त्यांची मालकी असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा या संदर्भातील निर्णय या रस्त्यांना लागू होत नाही, मात्र तरीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने या रस्त्यांवरील मद्य विक्री बंद केली असल्याचे आभारचे अध्यक्ष संजय चव्हाण, सुरेश गुप्ता, श्रीधर शेट्टी, योगेश एन. राय, अनिल खत्री आदिंनी निवेदनात म्हटले आहे.