पाच तासांत तयार झाले मैत्रीगीत!
By admin | Published: August 4, 2015 12:28 AM2015-08-04T00:28:46+5:302015-08-04T00:29:39+5:30
आगळा प्रयोग : नाशिकमधील कलावंतांचा उपक्रम
नाशिक : मैत्रीदिनानिमित्त वेगळे काय करावे, असे म्हणत ‘त्यांचा’ विचारविनिमय सुरू झाला... व्हॉट्स अॅपवर कलावंत मित्रांची मैफल जमली अन् अवघ्या पाच तासांत मैत्रीदिनाचे झकास दृकश्राव्य गाणे (व्हिडिओ सॉँग) तयारही झाले...
नाशिकमधील कलावंतांनी मैत्रीदिनानिमित्त हा आगळा प्रयोग केला. मैत्रीदिन प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो. कोणी मस्त भटकायला जाते, तर कोणी पार्टी करते; मात्र या दिनानिमित्त खास गाणे तयार करण्याची कल्पना गायिका गीता माळी यांना सुचली. लगेच व्हॉट्स अॅपवर एकत्र येत विचारविनिमय सुरू झाला. काही वेळातच गीतकार, संगीतकार, संगीत दिग्दर्शक यांची मैफल जमली आणि मैत्रीच्या नात्याचे वर्णन करणारे सुंदर गीत तयार झाले. हे गाणे ‘यू ट्यूब’वर अपलोड करण्यात आले आहे.
गीता माळी यांनी त्याचे गायन, तर ‘संत्रा फिल्म्स’चे विशाल दवंगे यांनी दिग्दर्शन केले आहे. योगीता हिने भूमिका, सचिन जाधव यांनी गीतलेखन केले आहे, तर जयदीप जाधव व सागर चोथवे यांनी संगीत दिले आहे. अनिकेत भावसार यांनी संकलन केलेले हे गाणे रॉक शैलीतील असून, त्याचे चित्रीकरण, गायन वगैरे सर्व प्रक्रिया अवघ्या पाच तासांत पूर्ण करण्यात आल्या. (प्रतिनिधी)