वर्षभरात पाचशे डीएनए चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:43 AM2018-07-24T00:43:28+5:302018-07-24T00:43:55+5:30
नाशिकला वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील डीएनए विभागात गुन्हेगारी संबंधित दाखल झालेल्या ५०० घटनांचे नमुने वर्षभरात पाठविण्यात आले असून, त्यापैकी ४३५ प्रकरणांचे अहवाल संबंधित पोलीस ठाण्यांना सादर करण्यात आले आहे.
पंचवटी : नाशिकला वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील डीएनए विभागात गुन्हेगारी संबंधित दाखल झालेल्या ५०० घटनांचे नमुने वर्षभरात पाठविण्यात आले असून, त्यापैकी ४३५ प्रकरणांचे अहवाल संबंधित पोलीस ठाण्यांना सादर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रयोगशाळेत जनावरांच्या मांसाचेही नमुने तपासून त्या आधारे वर्गीकरण करण्यास मदत होत आहे. पोलिसांच्या दृष्टीने अतिशय गुंतागुंत व संवेदनशील प्रकरणांमध्येच आरोपी, फिर्यादी, मृत व्यक्ती वा साक्षिदार अशांची डीएनए चाचणी केली जाते. या चाचणीतून प्रकरणाच्या मुळाशी जाण्यास व सत्यता पटविण्यास मदत होते. राज्यात अशा प्रकारच्या न्यायसहायक पूर्वी मोजक्याच होत्या, परंतु राज्यात दाखल होणारे गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण पाहता गेल्यावर्षी १ आॅगस्ट २०१७ मध्ये प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए विभाग सुरू करण्यात आला. यापूर्वी मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यातच अशाप्रकारची सोय होती. गुन्हेगारी संबंधित घटनांमध्ये लहान मुलींवर अत्याचार केलेल्या गेल्यावर्षी ५८, तर चालू वर्षात ३५ प्रकरणे डीएनए चाचणीसाठी दाखल झालेल्या आहेत. देशपातळीवर गोहत्या बंदीचा कायदा लागू झाल्याने गोमांसाची वाहतूक करण्याच्या घटनाही त्या प्रमाणात उजेडात येऊ लागले आहेत, अशा परिस्थितीत मांसाची ओळख पटविण्यासाठीदेखील न्यायसहायक प्रयोगशाळा उपयोगी ठरू लागली आहे. राज्यात या कायद्यांतर्गत जवळपास ९० हून अधिक प्रकरणे दाखल झालेले आहे. प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर सदर अहवाल पोलीस ठाण्यांना सादर करण्यात आले आहेत. डीएनए विभागात पितृत्व, मातृत्व, अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटविणे, खून, बलात्कार, चोरी, घरफोडी, लहान मुलींवर अत्याचार आदींसह अन्य प्रकरणे दाखल करण्यात येत असून, त्यात अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे गुन्हे अधिक आहेत.
रक्ताचे चारच गट असल्याने बहुतेक प्रकरणात रक्तगट सारखेच असतात. याबाबत चाचणी करण्यात येते. नाशिकच्या वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए विभाग सुरू केल्याने अवघ्या महिन्याभरातच अहवाल पाठविले जातात.
संवेदनशील प्रकरणाचा उलगडा
एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून केल्याची घटना घडल्याने पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले होते, मात्र पीडित बालिका तीच आहे का? याचा शोध घेण्यासाठी अर्धवट कवटी, हाडे तपासणीसाठी ताब्यात घेत डीएनए तपासणी करण्यात आली व मयत बालिकेची ओळख पटविण्यात आली. काही वर्षांपूर्वी विम्याची रक्कम मिळावी यासाठी संशयिताने हॉटेल वेटरचा खून करून स्वत:च मरण पावल्याचा बनाव केला होता.
४डीएनए प्रोफाइल केल्यानंतर मयत व्यक्ती दुसरी असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर आंध्र प्रदेशातून मृताच्या कुटुंबीयांचे डीएनए सादर केले होते. भोंदूबाबाने बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याने प्रकरण चिघळल्याने भोंदू बाबाचे काही लोक समर्थन करत असल्यामुळे पोलिसांपुढे तपासाला अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या प्रकरणात मृतकाच्या कपड्यावर जैविक नमुन्यात मिळालेल्या अंशावरून संशयित आरोपीचा शोध लागला होता.