नाशिक-पुणे महामार्गावर कार अपघातात पाच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:59 PM2017-10-16T23:59:30+5:302017-10-16T23:59:38+5:30
मृतांमध्ये रिपाइं युवती जिल्हाध्यक्ष; एक गंभीर नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावर शिखरेवाडी समोरील अंधशाळा बसस्टॉप येथे रस्त्याच्या मध्ये असलेल्या वडाच्या झाडावर रविवारी (दि. १५) रात्री लोगान गाडी भरधाव वेगात आदळल्याने रिपाइं युवती जिल्हाध्यक्ष प्रीती भालेरावसह पाच जण ठार झाले आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृतांमध्ये रिपाइं युवती जिल्हाध्यक्ष; एक गंभीर
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावर शिखरेवाडी समोरील अंधशाळा बसस्टॉप येथे रस्त्याच्या मध्ये असलेल्या वडाच्या झाडावर रविवारी (दि. १५) रात्री लोगान गाडी भरधाव वेगात आदळल्याने रिपाइं युवती जिल्हाध्यक्ष प्रीती भालेरावसह पाच जण ठार झाले आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर अंधशाळा बसस्टॉप, पुरोहित हॉटेलसमोर रस्ता रुंदीकरणामुळे वडाचे झाड रस्त्याच्या मध्येच उभे आहे. रविवारी रात्री ११.४० च्या सुमारास रिपाइं युवती जिल्हाध्यक्ष प्रीती अनिल भालेराव ऊर्फ प्रीती अविनाश सुतार (२३) रा. शांती पार्क, मातोश्रीनगर, उपनगर व इतर पाच जण महिंद्रा लोगान कारमधून (एमएच ०१ एई २४३६) उपनगरकडे जात होते. आनंद शशिकांत मोजाड (२२) रा. सार्थक बंगला, मातोश्रीनगर, उपनगर हा गाडी चालवत होता. शिखरेवाडी समोरून जात असताना अंधशाळा बसस्टॉप येथील रस्त्याच्या मध्ये असलेल्या वडाच्या झाडाचा अंदाज न आल्याने लोगान कार झाडावर जाऊन आदळली. अपघातामुळे कारचा चक्काचुर झाला असून मोठा आवाज झाला. त्यामध्ये गाडीतील सहाही जण अत्यंत गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकुन आजुबाजूचे रहिवासी व रस्त्याने येणारे-जाणारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन लोगान गाडीचे दरवाजे वाकवुन जखमींना बाहेर काढले. १०८ क्रमांकाला फोन करून आलेल्या रूग्णवाहीकेतुन जखमींना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. तोपर्यंत उपनगर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती.
रात्री जिल्हा रूग्णालयात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, नगरसेवक प्रशांत दिवे, राहुल दिवे आदि पदाधिकाºयांनी धाव घेतली होती. अपघाताच्या वृत्तामुळे जिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू
जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना गंभीर दुखापत झाल्याने रिपाइं युवती जिल्हाध्यक्ष प्रीती भालेराव, पूजा भोसले (२२) (पूर्ण नाव समजले नाही), निशांत ऊर्फ भावड्या सुभाष बागुल (३०) रा. श्रमनगर, पगारे मळा, उपनगर, सूरज रमेश गिरजे (२५) रा. हनुमंतानगर, लोखंडे मळा, जेलरोड या चौघांचा मृत्यू झाला.
रितेश सुभाष विश्वकर्मा, रा. समतानगर, आगर टाकळी व वाहनचालक आनंद शशिकांत मोजाड यांना रात्रीच पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी दुपारी उपचारादरम्यान रितेश विश्वकर्मा याचादेखील मृत्यू झाला.
ऐन दिवाळी सणामध्येच अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याने उपनगर, आगरटाकळी, जेलरोड आदी भागांत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.