गायींचा कळप रस्त्यावर; सिन्नर शिवारात अपघातात पाच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 10:56 PM2019-09-28T22:56:05+5:302019-09-28T23:08:45+5:30
ट्रक पाठीमागून येऊन आदळल्याने ट्रकमध्ये समोर बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत सिन्नर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद केली जात होती.
नाशिक : पुणे महामार्गावर शनिवारी (दि.२८) एक ट्रक आणि आयशरची धडक होऊन झालेल्या अपघातात एकूण ५ प्रवाशी जागीच ठार झाले आहे.
सिन्नर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, एक आयशर वाहन संगमनेरच्या दिशेने जात असताना सिन्नर शिवारात असताना महामार्गावर गायींचा कळप रस्त्यावर आल्यामुळे आयशर चालकाने तातडीने ब्रेक लगावला; मात्र त्यापाठीमागून येणाऱ्या ट्रकवरील (एमएच१८ क्यू ६०४८) चालकाला वेळीच नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे ट्रक पाठीमागून आयशरवर जाऊन आदळला.
या दोन्ही वाहनांमध्ये झालेला अपघात इतका भीषण होता की, वाहनांचा चक्काचूर झाला. तसेच गायींचा कळप घेऊन जाणारा गुराखी भरत दगडू शिंदे (५९, रा. झापवाडी, ता. सिन्नर), श्रवण ननद शहाणे (२४, रा. उत्तरप्रदेश), सुभाष यादव (२४, रा. उत्तरप्रदेश) हे या अपघातात मृत्यूमुखी पडले. तसेच एका गायीचाही मृत्यू झाला आहे. आयशरमध्ये लोखंडी सळ्या वाहून नेल्या जात होत्या. ट्रक पाठीमागून येऊन आदळल्याने ट्रकमध्ये समोर बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत सिन्नर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद केली जात होती. दोघा मयतांची रात्री उशिरापर्यंत ओळख पटू शकली नाही. याप्रकरणी पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहेत.