नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून पाच लाखांची रोकड गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:35+5:302021-07-14T04:18:35+5:30
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चलार्थपत्र मुद्रणालयात पाचशेच्या नोटांचे बंडल गहाळ झाल्याचे तेथील व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यानंतर तत्काळ व्यवस्थापनाने तपासाची सूत्रे ...
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चलार्थपत्र मुद्रणालयात पाचशेच्या नोटांचे बंडल गहाळ झाल्याचे तेथील व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यानंतर तत्काळ व्यवस्थापनाने तपासाची सूत्रे फिरविली. पाचशेच्या नोटांच्या बंडलमध्ये पाच लाखांची रोकड गहाळ झाली, की चोरी याचा तपास सुरू केला. दरम्यान, बहुतांश कर्मचाऱ्यांची चौकशीदेखील करण्यात आली. तसेच जाबजबाबही घेतले गेले. इमारतीच्या आवारात नोटांच्या बंडलचा शोधही घेतला गेला; मात्र कोठेही नोटांचे बंडल मिळून आले नाही. दरम्यान, गेली पाच महिने मुद्रणालयाच्या फॅक्ट फाइण्डिंग समितीकडून याबाबत तपास केला जात होता. या समितीने सर्व चौकशी पूर्ण करत त्यांचा चौकशी अहवाल उपनगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा सादर केला. तसेच मुद्रणालयातून पाच लाखांच्या रोकडचा अपहाराबद्दल तक्रार अर्जही दिला असून, यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची कडक सुरक्षाव्यवस्था असतानासुद्धा अशाप्रकारे इतकी मोठी रक्कम मुद्रणालयातून कशी गायब झाली? असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. या घटनेची शहरात दिवसभर चर्चा सुरू होती. मुद्रणालयाच्या सुरक्षाव्यवस्थेला या घटनेमुळे भगदाड पडल्याचे बोलले जात आहे.
-
---इन्फो--
पाचशेच्या नोटांचे दहा बंडल सापडेना
मुद्रणालयात छापल्या जाणाऱ्या भारतीय चलनाच्या नोटांपैकी पाचशे रुपयांच्या चलनी नोटांचे दहा बंडल फेब्रुवारी महिन्यापासून गायब झाले आहेत. ही रोकड सुमारे पाच लाख रुपयांच्या जवळपास असल्याचे बोलले जात आहे. कडक सुरक्षाव्यवस्था भेदून इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम कशी लांबविली गेली? याचा शोध मात्र पाच महिने उलटूनही गोपनीयरीत्या सुरू असलेल्या चौकशी समितीला लागू शकलेला नाही. दरम्यान, आता हे प्रकरण उपनगर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.
---इन्फो---
..असा आहे इतिहास
इंडिया सिक्युरिटी प्रेस अर्थात भारत प्रतिभूती मुद्रणालय ब्रिटिशकालीन असून, १९२४ साली इंग्रजांनी मुद्रणालयाची स्थापना केली होती. १९२८ साली पहिल्यांदा येथे पाच रुपयांची नोट छापली गेली होती. स्वातंत्र्यानंतर १९८० साली भारत सरकारने चलार्थपत्र मुद्रणालयाची स्थापना केली. तेव्हापासून करन्सी नोटप्रेसमध्ये १०, २०, ५०, १००, २००, ५००, २००० रुपयांच्या नोटा छापल्या जातात. दरवर्षी सुमारे सरासरी चार हजार दशलक्ष नोटा छापल्या जातात.
--कोट--
करन्सी नोट प्रेस प्रशासनाने अंतर्गत चौकशी केली आहे. फॅक्ट फाइण्डिंग कमिटीकडून मागील काही महिन्यांपासून गहाळ झालेल्या पाच लाखांच्या रोकडचा शोध घेतला जात आहे. कर्मचाऱ्यांचे जबाबही या समितीने नोंदविले आहे. रोकडचा तपास लागलेला नाही. समितीचा चौकशी अहवाल आणि तक्रार अर्जावरुन उपनगर पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार पुढील तपासाला दिशा दिली जात आहे.
-विजय खरात, पोलीस उपायुक्त, नाशिक
130721\13nsk_29_13072021_13.jpg
चलार्थपत्र मुद्रणालय