लाखोंचा ऐवज लुटला: गणेशोत्सवात पाच घरफोड्या अन् सोनसाखळ्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 03:42 PM2019-09-14T15:42:24+5:302019-09-14T15:43:36+5:30
नाशिक : धार्मिक सण-उत्सवांमुळे मागील दहा ते बारा दिवसांपासून पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र ...
नाशिक : धार्मिक सण-उत्सवांमुळे मागील दहा ते बारा दिवसांपासून पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र शहरात घरफोड्या, दुचाकीचोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सातपूर, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या दोन घटनांमध्ये भामट्यांनी तब्बल ४लाख ५७ हजार ५०० रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच ३५ हजार रूपये किंमतीच्या दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.
शहर व परिसरात ऐन गणोशोत्सवात गुन्हेगारीने डोके वर काढले. सोनसाखळी चोरीच्या घटनांपासून घरफोड्यांपर्यंत गुन्हे घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गणेशोत्सवात चोख पोलीस बंदोबस्तामुळे हजारो पोलीस रस्त्यावर होते. तसेच वाहने साततत्याने गस्तीवर असतानाही चोरट्यांनी सोनसाखळी चोरीचे धाडस केले. डीजीपीनगर क्रमांक-१मधील मंगलमुर्ती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आश्विनी भोसले (३३) यांची सदनिका अनंत चर्तुदशीच्या दिवशी भरदुपारी २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केली. बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिण्यांसह रोख रक्कम असा एकूण ४ लाख १३ हजार ५०० रूपयांचा ऐवज लूटून पोबारा केला. याप्रकरणी भोसले यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या घटनेत प्रबुध्दनगर येथील एका पीठ गिरणीचे शटरचे कुलूप तोडून ते उचकटून अज्ञात चोरट्याने ३५ हजार ५०० रूपयांची रोकड, ९ हजार रूपये किंमतीच्या तीन चांदीच्या मुर्ती असा एकूण ४४ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रशांत उध्दव भोसले यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शहरात पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रीय झाली असून ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू असतानाही चोरटे सर्रासपणे भरदिवसा बंद घरांचे कुलूप तोडून हजारो ते लाखो रूपयांचा ऐवज घेऊन पोबारा करत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
--
गणेशोत्सव काळात असे घडले गुन्हे
सातपूर, पंचवटी, आडगाव येथे खूनाचा प्रयत्न
इंदिरानगरला दोन तर म्हसरूळ, सातपूर पोलीस ठाणे हद्दीत तीन सोनसाखळ्या चोरी
पंचवटी, सातपूर, मुंबईनाका हद्दीत जबरी चोरी
अंबड, इंदिरानगर, उपनगर, पंचवटी, सातपूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीच्या घटना