सटाण्यात दिल्लीतून पाच जणांची एण्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 11:25 PM2020-04-03T23:25:49+5:302020-04-03T23:27:11+5:30
सटाणा : शहरात गुरु वारी (दि.२) रात्री अचानक दिल्लीहून पाच जण आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राज्याच्या जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद असताना ते पाच जण आलेच कसे, असा सवाल उपस्थित केला जात असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना चौदा दिवस रुग्णालयात ठेवावे अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
सटाणा : शहरात गुरु वारी (दि.२) रात्री अचानक दिल्लीहून पाच जण आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राज्याच्या जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद असताना ते पाच जण आलेच कसे, असा सवाल उपस्थित केला जात असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना चौदा दिवस रुग्णालयात ठेवावे अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
शहरातील एका भागात गुरु वारी रात्री अचानक दिल्लीहून पाच जण आले. त्यांच्या नातेवाइकांकडे आलेल्या या पाच जणांनी घरात थांबण्याऐवजी ते बाहेर फिरताना आढळले. लॉकडाउन काळात घरात राहणे बंधनकारक असताना राजरोस बाहेर फिरत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी सटाणा पोलिसांशी संपर्क साधून त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी हलविण्यात आले. मात्र डॉ.नायानी यांनी त्यांची तपासणी करून तसे कोणतेही लक्षणे नसल्याचे सांगून सोडून दिले.
हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांनी दिल्लीहून आलेल्या पाच जणांना चौदा दिवस रुग्णालयातच ठेवावे अशी मागणी केली. मात्र पोलिसांनी त्याला नकार देत त्यांना कोणी त्रास दिल्यास त्यांच्यावरच गुन्हे दाखल करू, असा सज्जड दमच दिला. यामुळे येथील नागरिक दहशतीखाली आहेत.
कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून, या भयंकर आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच दिल्लीत एका कार्यक्रमात संशयित मोठ्या प्रमाणावर सापडल्यामुळे अधिकच भीतीचे वातावरण पसरले असताना गुरु वारी (दि. २) रात्री ते पाच जण अचानक दिल्लीहून शहरातील एका भागात अवतरल्याने त्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली आहे. ते पाच जण रात्री फिरत असल्याने स्थानिक नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली असून, त्यांनी रात्र अक्षरश: जागून काढली.
देशभर लॉकडाउन केल्यामुळे सरकारने राज्या-राज्यातील, जिल्ह्या-जिल्ह्यातील सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हे कठोर पाऊल उचलले असताना ग्रामीण भागातदेखील गावागावात प्रवेशाला बंदी घालत एक पाऊल पुढे टाकले. सर्वत्र लॉकडाउनचे काटेकोर पालन केले जात असताना सटाण्यात दिल्लीचे लोक आलेच कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.