सुरगाणा घोटाळ्याची चौकशी सुरू पाच सदस्यीय समिती : पंधरा दिवसांत अहवाल
By admin | Published: May 27, 2015 12:25 AM2015-05-27T00:25:38+5:302015-05-27T00:31:00+5:30
सुरगाणा घोटाळ्याची चौकशी सुरू पाच सदस्यीय समिती : पंधरा दिवसांत अहवाल
सुरगाणा घोटाळ्याची चौकशी सुरू पाच सदस्यीय समिती : पंधरा दिवसांत अहवाल नाशिक : सुरगाणा येथील शासकीय धान्य गुदामातील सुमारे सव्वा पाच कोटी रुपये किमतीच्या धान्य घोटाळ्याप्रकरणी शासनाने नेमलेल्या पाच सदस्यीय समितीने या घोटाळ्याच्या चौकशीला सुरुवात केली असून, या समितीला येत्या पंधरा दिवसांत शासनाला अहवाल सादर करावयाचा आहे. या घोटाळ्यात आपला काही एक संबंध नसल्याचा दावा निलंबित तहसीलदारांनी केल्यामुळे समिती यासंदर्भातील चौकशीत सर्वच पैलूंवर चौकशी करणार आहे. सात तालुक्यांतील रेशन दुकानांना देण्यासाठी मनमाडच्या अन्नधान्य महामंडळातून निघालेले धान्य परस्पर सुरगाणा तालुक्यात वळते करून त्याची काळ्याबाजारात विक्री करण्याचा प्रकार डिसेंबर महिन्यात उघडकीस आल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता व अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी, सात तहसीलदारांसह तेरा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. ज्या सात तहसीलदारांच्या निलंबनाची घोषणा करण्यात आली, त्यांनी निर्दोष असल्याचा दावा करून संघटनेच्या माध्यमातून आपली बाजू मांडली होती. परिणामी विधिमंडळात घोषणा होऊनही दीड महिना या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटून अखेर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या आदेशान्वये निलंबनाचे आदेश काढण्यात आले. या आदेशाबरोबरच सुरगाणा धान्य घोटाळा व तहसीलदारांचा सहभाग तपासण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची घोषणाही करण्यात आली. त्यानुसार पुरवठा सचिव, पुरवठा उपआयुक्त, लेखा सहसंचालक, महसूल सचिव व गुदाम निरीक्षक यांचा समितीत समावेश आहे. या समितीला पंधरा दिवसांची मुदत देण्यात आल्यामुळे व त्यातही तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे तातडीने चौकशी पूर्ण करण्याचा भाग म्हणून सोमवारी गुदाम निरीक्षकांनी नाशकात धाव घेऊन या घोटाळ्याची प्राथमिक माहिती जाणून घेतली. अन्य सदस्यही बुधवारी या चौकशीला सुरुवात करणार आहेत.