नाशिकमध्ये पाच नवे कोरोना संशयित रूग्ण दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:53 PM2020-03-27T18:53:28+5:302020-03-27T18:55:36+5:30
नाशिक- जिल्ह्यात दाखल सर्व संशयित रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आणि शासकिय रूग्णालयाचा कोरोना कक्ष रिकामा झाला. त्यामुळे नाशिककरांना जरा कुठे दिलासा मिळाला असताना शुक्रवारी (दि.२७) पाच नवे संशयित दाखल झाले आहेत.
नाशिक- जिल्ह्यात दाखल सर्व संशयित रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आणि शासकिय रूग्णालयाचा कोरोना कक्ष रिकामा झाला. त्यामुळे नाशिककरांना जरा कुठे दिलासा मिळाला असताना शुक्रवारी (दि.२७) पाच नवे संशयित दाखल झाले आहेत.
कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने दक्षता घेत जिल्हा शासकिय रूग्णालयात कोरोना संशयितांसाठी विलगीकरण कक्ष सुरू केला. तेव्हा पासून आत्तापर्यंत ६० जणांना या ठिकाणी ठेवण्यात आले आणि त्यांचे स्वॅप घेऊन ते पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. मात्र, सर्वच अहवाल निगेटीव्ह आले होते. त्यानंतर शुक्रवारी तर रूग्णालयात अवघे दोन संशयित रूग्ण दाखल होते आणि त्यांचा अहवाल देखील निगेटीव्ह आला. त्यामुळे शासकिय यंत्रणांना दिलासा मिळाला होता. जिल्हा शासकिय रूग्णालयातील कोरोना कक्ष त्यामुळे रिकामा झाला होता. दरम्यान, असा दिलासा मात्र फार काळ टिकला नाही, अवघ्या काही तासातच आणखी पाच संशयित दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी कोरोनाग्रस्त देशातून आलेल्या नागरीकांत काही रोगाची लक्षणे आढळली तर त्यांना संशयित रूग्ण म्हणून दाखल करून घेतले जात ज्यात फार लक्षणे वाटत नाही त्यांना होम कोरंटाईन केले जात होते. परंतु शुक्रवारी दाखल रूग्णांपैकी तिन जणांनी विदेशात कोठेही प्रवास केला नव्हता. त्यामुळे प्रशसनाच्या काळजीत भर पडली आहे. या पाचही संशयित रूग्णांचे स्वॅप तपासणीसाठी घेण्यात आले असून पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. शनिवारी (दि. २८) त्यांचे तपासणीचे अहवाल प्राप्त होणार आहेत.
याशिवाय महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय, मालेगाव येथील सामान्य रूग्णालयात मात्र एकही संशयित दाखल नाही. आता पर्यंत विदेशातून आलेल्या आणि रूग्णालयात दाखल असलेल्या आणि नसलेल्या एकुण ५१७ नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात आज मितीस ४०९ नागरीक घरीच निगराणीखाली (होम कोरंटाईन) आहेत. दोन जणांना तपोवनातील विशेष विलगीकरण कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.