जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 02:00 AM2019-08-26T02:00:42+5:302019-08-26T02:00:59+5:30
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटनांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२५) घडली. मृतात शालेय विद्यार्थी, बालिकेसह उपसरपंचाचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटनांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२५) घडली. मृतात शालेय विद्यार्थी, बालिकेसह उपसरपंचाचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मनमाड येथे दोघांचा मृत्यू
मनमाड येथे वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. एसटी स्टँडजवळ असलेल्या वसाहतीत कृष्णा गोसावी यांनी घरगुती वादाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्य घटनेत जावेरीया खान या नऊवषीर्य मुलीचा नदीवरील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. चॉँदशाहवली दरगाहजवळ ही घटना घडली.
व्यावसायिकाचा मृत्यू
अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेल्या बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना सटाणा येथे रविवारी (दि.२५) घडली. नामदेव निवृत्ती कुमावत (५२) असे अपघातातील मृताचे नाव आहे. कुमावत मॉर्निंग वॉकसाठी गेले असता नामपूर रस्त्यावरील बागलाण अकॅडमीलगत अज्ञात
वाहनाने त्यांना जबर धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
मुलाचा बुडून मृत्यू
जोरण येथील दिनेश पोपट माळी (१ १) याचा गावाजवळील हत्ती नदीवरील बंधाºयात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. पाचव्या इयत्तेत शिकणारा दिनेश मित्राबरोबर अंघोळीसाठी बंधाºयावर गेला होता. खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला. तो बुडत असताना त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र परिसरात कुणीही नव्हते. आदिवासी वस्तीवर मोजमजुरी करणारे पोपट माळी यांचा दिनेश हा एकुलता एक मुलगा होता. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उपसरपंचांचा अपघाती मृत्यू
लोणारवाडी गावाजवळील गतिरोधकावर दोन कारमध्ये झालेल्या अपघातात लोणारवाडीचे उपसरपंच ज्ञानेश्वर विष्णू गोळेसर (५२) यांचा मृत्यू झाला. गोळेसर हे कारने (क्र. एमएच १५ डीएम १९०७) जात असताना दुसरी कार (क्र. एमएच ४२, बीके ९५००) यांच्यात भीषण धडक झाली. अपघातात ज्ञानेश्वर गोळेसर यांची प्राणज्योत मालवली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.