कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील पाच शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 01:45 AM2021-07-31T01:45:04+5:302021-07-31T01:46:07+5:30
जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले असतानाच पाच शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्याने अशा शाळा तूर्तास बंद करण्यात आल्या आहेत. या वृत्तास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीदेखील दुजोरा दिला आहे.
नाशिक : जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले असतानाच पाच शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्याने अशा शाळा तूर्तास बंद करण्यात आल्या आहेत. या वृत्तास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीदेखील दुजोरा दिला आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात करण्यात आलेल्या आहेत. ज्या गावात मागील महिनाभरात एकही कोरोना रुग्ण नाही अशा ठिकाणच्या शाळा सुरू करण्यास राज्य शासनाची परवानगी असल्याने जिल्ह्यातील अशा सुमारे ३३५ शाळा सुरू होऊ शकतात. मात्र अद्यापही काही शिक्षकांचे कोरोना अहवाल प्राप्त झालेले नसल्याने २७७ शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर दर सोमवारी शाळेतील काेरोना स्थितीचा आढावा घेतला जातो. अशा प्रकारचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील पाच शाळांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
सिन्नर, देवळा, मालेगाव, निफाड आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांतील शाळांमध्ये तीन शिक्षक, दोन शिक्षकेतर कर्मचारी आणि तीन विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्याने तेथील शाळा तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर या शाळा सुरू होऊ शकतील. मात्र त्यासाठी किमान महिनाभराचा तरी कालावधी लागणार आहे.
शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्यात आल्यामुळे दर सोमवारी याबाबतचा आढावादेखील घेतला जातो. शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या आरेाग्याचा अहवाल पाहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे. गावातील रुग्णसंख्या वाढली तर तेथील शाळा बंद करण्याची वेळ येऊ शकते. सध्या अशी वेळ आली नसली तरी शाळांमध्ये रुग्ण आढळल्याने शाळा तूर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत.
--इन्फो--
५८ शाळांना अजूनही बंदच
जिल्ह्यातील ३३५ शाळा सुरू होणार असल्यातरी अजूनही ५८ शाळा या सुरू होऊ शकलेल्या नाहीत. येथील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल अद्यापही प्राप्त झाले नसल्यामुळे परवानगी मिळूनही या शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची तसेच कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे.