जागा पाच, इच्छुक अनेक!
By admin | Published: July 9, 2017 12:23 AM2017-07-09T00:23:01+5:302017-07-09T00:23:13+5:30
नाशिक : महापालिकेच्या पाच जागांसाठी संख्या तीन आकडी असल्याने कोणाच्या पदरात माप टाकावे याबाबत भाजपात डोकेदुखी वाढली आहे,
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेच्या स्वीकृत सदस्याच्या पाच जागांसाठी इच्छुकांची संख्या तीन आकडी असल्याने कोणाच्या पदरात माप टाकावे याबाबत सत्ताधारी भाजपात डोकेदुखी वाढली आहे, तर शिवसेनेत गटबाजीमुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट संपर्कप्रमुख व पक्षप्रमुखांच्या स्वीय सचिवांकडे इच्छुकांना अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरू झाल्याने इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
महापालिकेत भाजपा ६६, शिवसेना ३५, कॉँग्रेस ६, राष्ट्रवादी ६, मनसे ५, अपक्ष ३ आणि रिपाइं १ असे पक्षीय बलाबल आहे. आता पाच स्वीकृत सदस्य नियुक्त करायचे असून, त्यासाठी प्रक्रिया नगरसचिव विभागाने सुरू केली आहे. येत्या ११ जुलैला आयुक्तांकडे सर्व गटनेत्यांची बैठक होणार आहे. एकूण १२२ सदस्यसंख्या असल्याने एका स्वीकृतसाठी २४.४०चा कोटा असणार आहे. त्यामुळे भाजपाचे सर्वाधिक तीन, तर सेनेचे दोन स्वीकृत सदस्य नियुक्त होऊ शकतात, तर कोटा पूर्ण करू न शकणाऱ्या कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष व रिपाइं यांना चालू पंचवार्षिक काळात स्वीकृत सदस्य देण्याची संधी नाही. स्वीकृतसाठी पाच जागांवर सेना-भाजपात मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळेच स्वीकृतची निवडप्रक्रिया गेल्या चार महिन्यांपासून लांबली होती. भाजपात तीन जागांसाठी इच्छुकांची संख्या शंभराहून अधिक असल्याचे सांगितले जाते. त्यात काही माजी नगरसेवकांसह त्यांच्या नातेवाइकांचाही समावेश आहे, तर आमदारांनीही आपल्या समर्थकांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केल्याचे समजते. त्यामुळे तिढा कायम आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पालकमंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागून असणार आहे. भाजपात इच्छुकांची संख्या सर्वाधिक असतानाच शिवसेनेतही दोन जागांसाठी चुरस आहे.