ट्रकचालक लूट प्रकरणातील पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:20 PM2020-02-27T18:20:04+5:302020-02-27T18:21:13+5:30
सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड शिवारात बसस्टॅण्डजवळ स्क्रॅप मटेरियल घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाला शस्त्राचा धाक दाखवून शनिवारी (दि. २२) रात्री ११.३० च्या सुमारास लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात फरार असलेल्या अन्य पाच संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड शिवारात बसस्टॅण्डजवळ स्क्रॅप मटेरियल घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाला शस्त्राचा धाक दाखवून शनिवारी (दि. २२) रात्री ११.३० च्या सुमारास लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात फरार असलेल्या अन्य पाच संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड येथे रात्रीच्या सुमारास एका परप्रांतीय ट्रकचा साकूर फाट्यापासून पाठलाग करून चोरट्यांनी मोटारसायकल आडव्या लावून घोरवड बसस्टॅण्डजवळ अडविले होते. शस्रांचा धाक दाखवून लुटण्याच्या प्रयत्नात असताना हा प्रकार जवळच असलेल्या स्थानिक नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी सतर्कहोत चोरट्यांना पकडले. संदीप देवराम कोकाटे (२०) व ज्ञानेश्वर काळू जळंदे हे नागरिकांच्या हाती लागले, मात्र अमर वसंत दिवटे (१९), किरण वसंत दिवटे (२०), नीलेश गंगाराम गिळंदे (१९), सुभाष गोटीराम दिवटे (१९), रोहित गोरख गिळंदे (१९) आदी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. पोलिसांनी तपास करून या पाच जणांना त्यांच्या राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले. या टोळीकडून महामार्गावरील आणखी लूट व चोरी प्रकरणांचा तपास लागण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी, पोलीस हवालदार पवार पुढील तपास करीत आहे.