मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 09:30 AM2024-05-15T09:30:59+5:302024-05-15T09:35:52+5:30
मोदींची सभा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीजवळच आहे. कांदा उत्पादकांमध्ये केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीविरोधात नाराजी आहे.
नाशिकमध्ये कांदा निर्यात बंदी व कांद्याचे पडलेले दर लोकसभा निवडणुकीचे वातावरण फिरवण्याची शक्यता आहे. हे दोन कळीचे मुद्दे महायुतीची डोकेदुखी वाढवत असताना आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होत आहे. या सभेला शेतकरी आणि संघटना आंदेलन करण्याची शक्यता असल्याने तसेच सभेत गोंधळ होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अशा लोकांवर लक्ष ठेवला आहे. यातूनच आज ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी नजरकैदेत ठेवले आहे.
मोदींची सभा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीजवळच आहे. कांदा उत्पादकांमध्ये केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीविरोधात नाराजी आहे. या शेतकऱ्यांचे एकरी तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी लोकमतने दिले होते. कांदा प्रश्नावरून काही शेतकऱ्यांनी मोदींना सभेवेळी जाब विचारणार असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले असून ठाकरे गटाच्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गेल्या दहा वर्षांत मोदींनी शेतकरी विरोधी धोरणे राबविल्याचा आरोप करत आजच्या सभेत त्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा या शिवसैनिकांनी दिला होता. यामुळे या कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्याची कारवाई करण्यात आली आहे.
याचबरोबर मोदींच्या सभेत कांदा उत्पादकांचे आंदोलन होण्याच्या शक्यतेने कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरु केली आहे. तसेच ठाकरे गटाच्या अनेकांना पोलिसांनी नोटीसही बजावली आहे.