आरटीई प्रवेशासाठी पाच हजार अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 01:39 AM2021-03-08T01:39:50+5:302021-03-08T01:41:27+5:30
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत संकेतस्थळावर रविवार (दि. ७) सायंकाळपर्यंत सुमारे ५ हजार ७६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी २१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत संकेतस्थळावर रविवार (दि. ७) सायंकाळपर्यंत सुमारे ५ हजार ७६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी २१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत नाशिक जिल्ह्यातील ९१ शाळांसह जिल्ह्यातील ४५० शाळांची नोंदणी झाली असून शहरातील ९१ शाळांमध्ये १ हजार ५४६ तर उर्वरित जिल्ह्यातील ३५९ शाळांमध्ये २९९८ विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत जागा राखीव आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे ५ हजार ७६ अर्ज प्राप्त झाले आहेत.
दरम्यान, आरटीई प्रवेश प्रक्रियेत लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशाची संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी रहिवासाचा पत्ता असणारा पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे पडताळणी समितीकडे सादर करावे लागणार आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत तीन शाळांची वाढ झाली असली तरी आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांमध्ये मात्र १ हजार १३ जागांनी घट झाली आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे शक्य नसल्याने राज्य पातळीवर एकाच वेळी सोडत काढली जाणार आहे. त्याचप्रमाणे उपलब्ध जागांच्या प्रमाणातच प्रतिक्षा यादीही या सोडतीच्या माध्यमातून जाहीर केली जाणार आहे.