पैशांचा पाऊस! 'एटीएम'मधून निघाली पाचपट रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:52 AM2018-06-19T01:52:49+5:302018-06-19T11:05:01+5:30
विजयनगर येथील एका खासगी बँकेच्या एटीएम मशीनमधून एक हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला चक्क पाचपट रक्कम म्हणजे पाच हजार रुपये मिळत असल्याने पैसे काढण्यासाठी सिडको परिसरातील नागरिकांनी सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मोठी गर्दी केली होती.
सिडको (नाशिक) : विजयनगर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम मशीनमधून एक हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला चक्क पाचपट रक्कम म्हणजे पाच हजार रुपये मिळत असल्याने पैसे काढण्यासाठी सिडको परिसरातील नागरिकांनी सोमवारी (18 जून) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मोठी गर्दी केली होती. याबाबतची माहिती बँकेच्या प्रशासनाला कळेपर्यंत ग्राहकांनी तब्बल दोन लाख ६८ हजार रुपयांची रक्कम काढली असल्याचे समजते. सिडकोतील विजयनगर येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम मशीन बसवण्यात आले असून या एटीएममध्ये सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास या मशीनमध्ये बँकेच्या वतीने रक्कमेचा भरणा करण्यात आला.
त्यानंतर काही ग्राहकांनी रक्कम काढली. मात्र रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास एटीएममध्ये अंतर्गत बिघाड झाल्याने ग्राहकांना १ हजार रुपये काढायचे असल्यास ५ हजार रुपयांची रक्कम मिळू लागली होती. ही घटना कानोकानी अनेक ग्राहकांनी या एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. त्याच वेळी बँक ग्राहक अमोल गोलाईत हे ४ हजार रुपये काढण्यासाठी गेले असताना त्यांना २० हजार रुपये हाती आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ अॅक्सिस बँकेच्या प्रशासनाला याबाबत कळविले असता बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक प्रवीण भिसे या एटीएम केंद्रावर गेले.
त्यांनी याबाबत पोलिसांना तात्काळ कळविले असता याठिकाणी पोलीस दाखल झाले. याचवेळी ग्राहकांची गेथे गर्दी झाल्याने एटीएम केंद्र बंद करून गर्दी हटविण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी (19 जून) चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या प्रकारामुळे सुमारे २ लाख ६२ हजार रुपये एटीएममधून निघाल्याचेही सांगण्यात आले.