पाच गावांना फटका : २० घरांची पडझड; आठ दुकानांचे नुकसान
By admin | Published: August 3, 2016 10:24 PM2016-08-03T22:24:07+5:302016-08-03T22:25:48+5:30
सायखेड्यात पूरस्थिती कायम
कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेड्यासह गोदाकाठच्या गावांची पूरस्थिती बुधवारीही कायम होती. पुरामुळे या भागाला जोडणारे सर्व रस्ते पाण्याखाली असून, गेल्या ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित आहे. दरम्यान, बुधवारीही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या जवानांनी सायखेडा चौफुलीवर अडकलेल्या डॉक्टरसह नऊ जणांना बाहेर काढले.
चांदोरी, सायखेडा, शिंगवे, चाटोरी या गावांची गोदावरीच्या महापुराची स्थिती आज दुसऱ्या दिवशी कायम होती. चांदोरी येथील कोळीवाडा, बसस्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बाजारपेठ आजही पाण्याखाली असून, संपूर्ण चांदोरी गावाला पुराचा वेढा पडला आहे. पूरग्रस्तांना माजी आमदार दिलीप बनकर यांनी पिण्याच्या पाण्याच्या पिशव्या तर काही सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने बिस्कीट आणि पुरी-भाजीची पाकिटे वितरित करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी राधाकृष्णन, प्रांताधिकारी यांच्यासह विविध अधिकारी, एनडीआरएफच्या जवानांचा ताफा चांदोरीत तळ ठोकून आहे.
चांदोरीकडे येणारे बहुतांश रस्ते आजही बंद होते. गावात दोरीच्या साहाय्याने लोक ये - जा करू लागले असून, कोळीवाडा व काही भागात मात्र अद्यापही संपर्क होत नसल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत.
सायखेडा येथील गंगा नगर व संपूर्ण बाजारपेठेत पुराचे पाणी आहे. सायखेडा चौफुलीवर बुधवारी दुपारपर्यंत १० फूट पाणी होते. (वार्ताहर)