पत्त्याच्या इमल्यासारखे पाच वाडे रात्री एकाचवेळी कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:01 AM2019-08-06T00:01:50+5:302019-08-06T00:02:57+5:30
रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नाव दरवाजा परिसरात पाच वाडे ढासळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याहीप्रकारे मनुष्यहानी झाली नाही.
नाशिक : संततधार पावसामुळे वाडे कोसळण्याची मालिका जुन्या नाशकात सुरूच असून सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नाव दरवाजा परिसरात पाच वाडे ढासळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याहीप्रकारे मनुष्यहानी झाली नाही.दरम्यान, सकाळी पाटील गल्ली येथील भांगरेवाड्याचा काही भग कोसळला. त्यामुळे दिवसभरात एकूण सहा वाडे जुने नाशिक भागात पडले.
या पंधरवड्यात जुने नाशिक भागात सुमारे १८ ते २० वाडे व १५ भींती पडल्याची नोंद अग्निशामक दलाकडे आहे तर परसिरात या दोन दिवसांत सुमारे दहा ते पंधरा वाड्यांचे भाग कोसळल्याची तक्रार नगरसेवक शाहू खैरे यांनी केली तसेच या संदर्भात मनपा अधिकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही असा आरोपही खैरे यांनी केला.
रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नावदरवाजा येथे अरूंद गल्लीत असलेला भालेराव वाड्याचा मोठा भाग कोसळला. पडलेल्या भींतींचा मलबा शेजारच्या वाड्यांवर पडून बोळीतील अन्य चार वाडेदेखील ढासळले. यामध्ये कुलकर्णी, दिक्षित वाड्यांचाही समावेश आहे. या वाड्यांच्या भींती सामायिक असून एकमेकांना हादरा बसल्याने वाडे पत्त्याच्या इमल्यासारखे कोसळले. पडक्या वाड्यासंदर्भात महापालिका क्लस्टर योजना राबवित असून त्यासाठी आघात मुल्यमापन अहवाल तयार करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच हा विषय मार्गी लागणार असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान फायरमन श्याम राऊत, राजेंद्र पवार, उदय शिर्के, सुहास अभंग यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरूवात केली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवीतहानी झाली नाही. या वाड्यांमध्ये कोणी राहत नव्हते. हे सगळे वाडे पडके झाले होते.