पाच वर्षांतील नीचांकी अंदाजपत्रक
By admin | Published: September 9, 2016 01:26 AM2016-09-09T01:26:53+5:302016-09-09T01:27:06+5:30
महापालिका : महासभेने सुचविली अवघी २३ कोटींची वाढ
नाशिक : महापालिकेच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रशासनाने हात टेकले असतानाच सत्ताधारी मनसेलाही हात आखडता घ्यावा लागला असून, सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात महासभेने अल्पशी २३.५५ कोटींची वाढ सुचवली आहे. त्यामुळे महापालिकेचे अंदाजपत्रक आता १७६१.५१ कोटींवर येऊन
थांबले आहे. गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदा महासभेने मंजूर केलेले हे सर्वांत नीचांकी अंदाजपत्रक ठरले आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सन २०१६-१७ साठी १३५७.९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा ऊहापोह करण्यात आला होता. विकासकामांसाठी फारसा निधी उपलब्ध होऊ शकणार नाही, असेही सूचित करण्यात आले होते.
आयुक्तांच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने ३८० कोटींची वाढ करत ते १७३७.९६ कोटींवर नेऊन ठेवले होते. स्थायीने महासभेवर अंदाजपत्रक सादर केल्यानंतर सत्ताधारी मनसेकडून त्यात किती कोटी रुपयांची भर पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक होणार असल्याने सत्ताधारी मनसेकडून यंदा अंदाजपत्रकात लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
त्यातच महापौरांकडून महासभेचा ठराव प्रशासनाकडे पाठविण्यात चालढकल केली जात असल्याने अंदाजपत्रक फुगण्याचाही अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, महासभेने स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात केवळ २३.५५ कोटी रुपयांची वाढ सुचविली असून अंदाजपत्रक १७६१.५१ कोटींवर येऊन थांबले आहे.
महासभेचा ठराव नगरसचिव विभागाला प्राप्त झाला असून, विभागाने तो आता समन्वय कक्षाकडे पाठविला आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाच्या प्रती लवकरच सदस्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)