नाशिकमध्ये संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; पंधरवड्यात दुसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 08:46 PM2017-09-21T20:46:27+5:302017-09-21T20:48:43+5:30
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील औद्योगिक वसाहतीजवळ संध्याकाळी बिबट्याने एका पाच वर्षाच्या बालकावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचा मृत्यू झाला
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील औद्योगिक वसाहतीजवळ संध्याकाळी बिबट्याने एका पाच वर्षाच्या बालकावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचा मृत्यू झाला आहे. मागील पंधरवड्यापासून दिंडोरी तालुक्यामधील कादवानदीचा काठ बिबट्याने थरारत आहे.
याबाबत वनविभाग दिंंडोरी वनपरिक्षेत्राकडून मिळालेली माहिती अशी, लखमापूर फाटा येथे औद्योगिक वसाहतीत उसक्षेत्राला लागून असलेल्या एका घराजवळ खेळत असलेला विवेक राजदेव बिंद या मुलावर बिबट्याने ऊसाच्या शेतामधून येत अचानकपणे हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विवेकचा मृत्यू झाला.याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तसेच वनविभागाच्या कर्मचाºयांनीही पंचनामा करुन वनविभागाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया सुरू केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सुमारे आठ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्यशासनाच्या वनमंत्रालयाकडून केली जाते.
कादवा काठालगत बिबट्याने धुमाकूळ घातला असून या भागात एकूण पाच पिंजरे तैनात करण्यात आले आहे; मात्र अद्याप बिबट्या जेरबंद होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पंधरा दिवसांपुर्वीच बिबट्याने एका तीन वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला करून ठार केले होते. या हल्ल्याची घटना ताजी असताना पुन्हा बिबट्याने गुरूवारी संध्याकाळी केलेला मुलावरील हल्ला अत्यंत दुर्देवी आहे. ऊसाची शेती जास्त असून या भागात बिबट्याला नैसर्गिक अधिवास उपलब्ध झाल्यामुळे बिबट्याला जेरबंद करणे अवघड होत आहे.