फटाक्यांच्या स्टॉल्ससाठी २७ जागा निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:30 AM2018-10-21T00:30:49+5:302018-10-21T00:31:08+5:30
दसरा संपताच दिवाळीचे वेध लागले असून, महापालिकेच्या वतीने फटाके विक्रीच्या दुकानांसाठी २७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात इदगाह मैदानाचादेखील समावेश आहे. दरम्यान, फटाके व्यावसायिकांना आता तीन हजार रुपयांचे स्वच्छ पर्यावरण शुल्क सक्तीचे करण्यात आले असून, ते संबंधित व्यावसायिकांना भरावे लागणार आहे.
नाशिक : दसरा संपताच दिवाळीचे वेध लागले असून, महापालिकेच्या वतीने फटाके विक्रीच्या दुकानांसाठी २७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात इदगाह मैदानाचादेखील समावेश आहे. दरम्यान, फटाके व्यावसायिकांना आता तीन हजार रुपयांचे स्वच्छ पर्यावरण शुल्क सक्तीचे करण्यात आले असून, ते संबंधित व्यावसायिकांना भरावे लागणार आहे.
महापालिकेच्या वतीने दरवर्षीच सुरक्षित ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल्स लावण्यासाठी जागा निश्चित केल्या जातात. यंदाही त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात पूर्व विभागात राणे नगर कॉर्नर, पौर्णिमा स्टॉपजवळ, कलानगर (इंदिरा नगर), इंदिरानगर येथील ओंकार गारमेंटसमोरील जागा अशा जागा असून, पश्चिम विभागात गोल्फ क्लब मैदान (इदगाह मैदान), संदीप हॉटेलसमोरील जागा, पंचवटी विभागात तपोवनातील साधुग्राम परिसर, अमृतधाम सोसायटीलगत, नवीन बळी मंदिराच्या पूर्व जागेस, पेठरोड पाटालगतच्या मोकळ्या जागेत, दिंडोरीरोडवरील आरटीओ आॅफिसकडे जाणाऱ्या लिंक रोडवर, म्हसरूळ येथील गीतानगर याठिकाणी जागा स्टॉलसाठी आहेत.
नाशिकरोड विभागात चेहेडी ट्रक टर्मिनस, चेहेडी पंपिंगरोडवरील मनपाच्या खुल्या जागेत, के. एन. केला शाळेशेजारी मोकळ्या जागेत, गाडेकर मळ्यासमोरील मोकळ्या जागेत, शिवाजीनगर समाजमंदिर मैदान, जेलरोड, मनपा शाळा क्रमांक १२५चे मैदानालगतची जागा, जेलरोडवरील फॅशन फॅब्रिक्सपासून दुकानासमोरील पश्चिमेस फुटपाथलगतची जागा अशा प्रकारच्या सात जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
तसेच सातपूर विभागात क्लब हाउस मैदान, आनंदवल्ली मनपा शाळेजवळ, तसेच शिवाजीनगर येथील कार्बन नाका परिसर आणि सिडको विभागात जुने शॉपिंग सेंटर, लेखानगर पाठीमागे, राजे संभाजी स्टेडियममध्ये, पवननगरच्या पाण्याच्या टाकीजवळील नियोजित स्टेडियमच्या जागेत, पाथर्डी फाटा भाजीबाजाराच्या खुल्या जागेत आणि मौजे पाथर्डी शिवार सर्व्हे नंबर ९११ प्लॉट नंबर ७६च्या कंम्पाउंडलगत अशाप्रकारच्या जागा निश्चित असून, पुढील आठवड्यात २५ व २६ आॅक्टोबर रोजी लिलाव होणार आहेत.
क्रीडांगणात फटाके विक्रीने आश्चर्य
महापालिकेच्या वतीने क्रीडा संकुलातील जागेत फटाके विक्रीसाठी जागा निश्चित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजे संभाजी स्टेडियम, क्लब हाउस सातपूर अशा प्रकारच्या मैदानांचा समावेश केल्याने क्रीडाप्रेमींमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.