बाजार समितीत ठिय्या आंदोलन

By admin | Published: September 8, 2015 12:19 AM2015-09-08T00:19:40+5:302015-09-08T00:20:29+5:30

सेल हॉलमध्ये बसण्यास विरोध : सभापती पैसे मागत असल्याचा आरोप

Fixed agitation in the market committee | बाजार समितीत ठिय्या आंदोलन

बाजार समितीत ठिय्या आंदोलन

Next


पंचवटी : दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये सकाळच्या वेळी बसणार्‍या किरकोळ व्यापार्‍यांना शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीने पायबंद घातल्याने सोमवारी दोघा संचालकांसह संतप्त किरकोळ व्यापार्‍यांनी तासभर ठिय्या आंदोलन केले. बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे हे किरकोळ व्यापार्‍यांना सेल हॉलमध्ये जागा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली पैशांची मागणी करीत असल्याचा खळबळजनक आरोप संचालक शिवाजी चुंबळे, यांच्यासह किरकोळ व्यापार्‍यांनी केला आहे.
बाजार समितीच्या आवारातील सेल हॉलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अडीचशे ते तिनशे किरकोळ व्यापारी मिरची, टमाटा, लिंबू तसेच कोथिंबीर असा शेतमाल खरेदी करून पहाटे पाच ते सकाळी दहा वाजेपर्यंत बसून शेतमालाची विक्री करतात. मात्र गेल्या आठवड्याभरापासून बाजार समितीने सेल हॉलमध्ये बसण्यास किरकोळ व्यापार्‍यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे सध्या किरकोळ व्यापारी बाजार समितीबाहेर असलेल्या प्रवेशद्वारावर बसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ व्यापारी बाजार समितीत शेतमाल खरेदी करून तो विक्रीचा व्यवसाय करत आहे त्यामुळे ना वाहतुकीला ना लिलाव प्रक्रियेत अडथळा येतो मात्र सभापती पिंगळे विनाकारण किरकोळ व्यापार्‍यांची छळवणूक करून आर्थिक हितासाठी व्यापार्‍यांची अडवणूक करीत असल्याने सकाळी मुख्य कार्यालयासमोर संचालक चुंबळे यांच्यासह किरकोळ व्यापार्‍यांनी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, बाजार समितीने सेल हॉलमध्ये बसणार्‍या काही व्यापार्‍यांना पावत्यादेखील दिल्या असून, किरण कातड नामक व्यक्तीदेखील किरकोळ व्यापार्‍यांकडून पैसे वसूल करत असल्याची तक्रार सुनीता निकम या महिलेने केली आहे. व्यापार्‍यांकडून सकाळी संतप्त व्यापार्‍यांनी बाजार समितीत सुरू असलेल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करून घोषणाबाजी केली.
आंदोलनात संचालक चुंबळे, संचालक संदीप पाटील, शेखर निकम, संजय उन्हवणे, संदीप पगारे, रामदास पवार, दिनेश गवळी, अजय चोथे, तेजूल मेश्राम, माधव नागरे आदिंसह शेकडो किरकोळ व्यापारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)

पणन संचालकांच्या आदेशानुसार बाजार समितीने शेतकर्‍यांच्या हितासाठी कारवाई केली आहे. सेल हॉलमध्ये बसणारे चवली दलाल शेतकर्‍यांकडून कमी भावाने खरेदी करतात व तेथेच अधिक दराने विक्री करतात. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
- देवीदास पिंगळे, सभापती, कृउबा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळच्या वेळी शेकडो किरकोळ व्यापारी आपापला व्यवसाय करतात. त्यांच्यामुळे कोणालाही अडथळा होत नाही. सभापती देवीदास पिंगळे हे विनाकारण व्यापार्‍यांना त्रास देण्याच्या इराद्याने किरकोळ व्यापार्‍यांकडून पैशांची मागणी करत असून, हे अत्यंत चुकीचे आहे. किरकोळ व्यापार्‍यांची पिळवणूक होत असून, त्यातून एखाद्याचा हकनाक बळी गेल्यास बाजार समिती व सभापतींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येईल.
- शिवाजी चुंबळे

 

Web Title: Fixed agitation in the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.