फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:21 AM2017-10-14T00:21:18+5:302017-10-14T00:21:25+5:30
फटाक्यांचे दुष्परिणाम लक्षात आल्याने कमीत कमी फटाके उडविण्याचा संकल्प करतानाच नाशिक शहरातील सुमारे साडेतीन हजार मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी संकल्पनेच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून (कै.) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संकल्पनेतून फटाकेमुक्त दिवाळीअंतर्गत प्रबोधन मोहीम चालविण्यात येत आहे. राज्यभरात अशा प्रकारची मोहीम यंदाही सुरू आहे.
नाशिक : फटाक्यांचे दुष्परिणाम लक्षात आल्याने कमीत कमी फटाके उडविण्याचा संकल्प करतानाच नाशिक शहरातील सुमारे साडेतीन हजार मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी संकल्पनेच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून (कै.) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संकल्पनेतून फटाकेमुक्त दिवाळीअंतर्गत प्रबोधन मोहीम चालविण्यात येत आहे. राज्यभरात अशा प्रकारची मोहीम यंदाही सुरू आहे. दिवाळी आणि फटाके हे समीकरण होत चालले असले, तरी फटाक्यांमुळे अनेकांना इजा होतात, घरादारांना आग लागण्याच्या दुर्घटना घडतात. त्याचप्रमाणे फटाके फोडल्यानंतर निघणाºया धुरामुळे प्रदूषण होते, शिवाय नागरिकांना श्वसनाचे आजार होतात. त्यामुळे मुलांना हे सर्व दुष्परिणाम समजावून सांगितले जातात. आणि त्यानंतर कमीत कमी रकमेचे फटाके उडवा आणि उर्वरित रक्कम गरिबांना मदत म्हणून देणे किंवा वस्तू देण्यासारख्या सामाजिक उपक्रमासाठी वापरा, असा सामाजिक जाणिवेचा संदेश दिला जातो. त्यानंतर पालक आणि शिक्षकांना विश्वासात घेऊन या मुलांकडून प्रतिज्ञापत्रक भरून घेतले जाते. या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली आहे.