सौरपथदीप विषयावरून चकमक

By admin | Published: November 3, 2015 10:28 PM2015-11-03T22:28:29+5:302015-11-03T22:29:10+5:30

आमसभा : सकाळे-देवरे यांच्यात वादंग, कमी दराच्या निविदेस शर्तींवर मंजुरी

Flint from Solarpindi | सौरपथदीप विषयावरून चकमक

सौरपथदीप विषयावरून चकमक

Next

नाशिक : ग्रामीण भाग सौर पथदीपांनी उजळण्यासाठी जिल्हा परिषदेने मागविलेल्या निविदा तब्बल २७ टक्के कमी दराने आल्या असतानाच सदस्यांनी मात्र कमी दराच्या निविदा कशा आल्या,या विषयावरून प्रश्नांची सरबत्ती केली. काही सदस्य निविदेचे समर्थन करीत असताना दुसऱ्या जाणकार सदस्यांनी मात्र कामात दर्जा टिकून राहावा यासाठी संबंधित ठेकेदाराकडून कमी दराइतकी म्हणजेच २७ टक्के अनामत घ्यावी आणि ठेकेदाराने नकार दिल्यास फेरनिविदा मागवाव्या अशी मागणी केली. त्यानुसार ठराव करण्यात आला परंतु दुसरीकडे पथदीपांच्या विषयावरून कॉँग्रेस गटनेता संपतराव सकाळे आणि माकपाचे प्रशांत देवरे यांच्यात जोरदार वाद झाले. सकाळे यांनी सभात्याग करण्याचा प्रयत्न केला परंतु अन्य सदस्यांनी विनवणी करून त्यांना परत आणले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आमसभा घेण्यात आली. ग्रामीण भागातील सौर पथदीप बसवण्यासाठी तीन कोटी रुपयांचा ठेका देण्याचा विषय चर्चेला होता. या अगोदरच्या परप्रांतीय ठेकेदाराने काम न केल्याने परिषदेने ई-निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार गुजरातमधील ठेकेदाराने २७ टक्के कमी दराची निविदा दाखल केली आहे. परंतु इतक्या कमी दराच्या निविदेमुळे ठेकेदार चांगल्या दर्जाचे पथदीप देणार नाही त्यामुळे फेरनिविदा काढा, अशी काही सदस्यांची मागणी होती. त्याचे प्रतिबिंब आमसभेत उमटले. गुणवत्तेचा दर्जा चांगलाच असला पाहिजे, त्यामुळे ठेकेदाराकडून १७ टक्के सुरक्षा अनामत रक्कम घ्या अशी काही सदस्यांनी, तर काही सदस्यांनी २७ टक्के सुरक्षा अनामत घ्या अशी मागणी केली. दुसरीकडे काही सदस्यांनी मात्र ठेकेदाराच्या कामाचा दर्जा आणि अन्य तांत्रिक बाबी तपासण्याची जबाबदारी प्रशासनातील अधिकाऱ्यांची आहे, ती ते पार पाडतील असे सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ही चर्चा होत असताना कॉँग्रेसचे संपतराव सकाळे यांनी या प्रकरणात दलाली करू नका म्हटल्याचा आरोप करीत माकपचे प्रशांत देवरे यांनी वाद घातला. कामाच्या गुणवत्तेविषयी बोलायचे नाही काय? असा प्रश्न करीत त्यांनी सकाळे यांना तुमच्या वयाचा विचार करून आम्ही बोलत नाही, तुमच्या कारकीर्दीत अडीच वर्षांत काय कामे केली हे माहिती आहे असे त्यांनी सांगताच सकाळेही संतापले. दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की प्रकरण हमरी तुमरीवर जाऊ लागले. त्याचवेळी अध्यक्ष विजयश्री चुंभळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती केदा अहेर आणि कॉँग्रेस सदस्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
आपण कोणाचे नाव घेऊन बोललो नव्हतो, असे सांगत सकाळे यांनी आसन सोडले आणि सभागृहात लोकशाही नाही, भ्रष्टाचारावरच चर्चा होते, असे म्हणून ते सभात्याग करू लागले. यावेळी कॉँग्रेस सदस्यांनी त्यांना विनवणी केली. भ्रष्टाचार सभागृहातच मांडू, पण तुम्ही जाऊ नका असे सांगितल्यानंतर सकाळे जागेवर परत आले. दरम्यान, सभेचे कामकाज सुरू होऊन रवींद्र देवरे यांनीही ठेकेदाराकडून २७ टक्के सुरक्षा अनामत घेण्याची सूचना केली आणि ती ठेकेदाराला मान्य नसल्यास नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी सूचना केली, त्यानुसार ती मान्य करण्यात आली. चर्चेत केदा अहेर, डॉ. प्रशांत सोनवणे, अनिल पाटील, राजेश नवाळे, गोरख बोडके, प्रवीण जाधव, संदीप गुळवे यांनी सहभाग घेतला.

Web Title: Flint from Solarpindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.