अर्जासाठी आज उडणार झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:55 AM2019-10-03T00:55:23+5:302019-10-03T00:56:03+5:30
नाशिक : पितृपक्ष समाप्तीनंतर अर्ज दाखल होण्यास गती येऊ शकेल, असे वाटत असताना राजकीय समीकरणांच्या गणितात उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे मंगळवारपर्यंत अर्ज दाखल करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नव्हता. मात्र, आता सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्यामुळे गुरुवारी (दि. ३) अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.
नाशिक : पितृपक्ष समाप्तीनंतर अर्ज दाखल होण्यास गती येऊ शकेल, असे वाटत असताना राजकीय समीकरणांच्या गणितात उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे मंगळवारपर्यंत अर्ज दाखल करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नव्हता. मात्र, आता सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्यामुळे गुरुवारी (दि. ३) अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने साहजिकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत्या दोन दिवसांत गर्दी होणार आहे. पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी तालुकानिहाय अर्ज दाखल करण्याची व्यवस्था असून, जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नाशिक पूर्व, पश्चिम आणि मध्य या शहरातील तीन मतदारसंघांबरोबरच इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे गुरुवारी या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारासोबत चारच जणांना कक्षात येण्याची परवानगी आहे.
गेल्या २७ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असला तरी पितृपक्षामुळे अनेकांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यामुळे सोमवारी अर्ज दाखल होऊ शकतील, असे वाटत असताना सोमवारी जिल्ह्यात अवघ्या ९ जणांनी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी जवळपास सर्वज राजकीय पक्षाचे प्रमुख उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. यातील अनेकांनी यापूर्वीच डमी अर्ज नेले आहेत. आता ते अधिकृत पक्षाचा एबी अर्ज दाखल करून उमेदवारी अर्ज दाखल करतील.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार २७ तारखेपासून ४ आॅक्टोबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी केवळ एका इच्छुकाने अर्ज सादर केला होता तर शनिवार आणि रविवार शासकीय सुटी असल्याने हे दोन्ही दिवस निरंक राहिले. दि. २ रोजी गांधी जयंतीनिमित्तानेदेखील अर्ज दाखल होऊ शकले नाहीत. जिल्हा प्रशासन सज्जगुरुवारी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता निवडणूक शाखेने संपूर्ण यंत्रणेला सज्जतेचे आदेश दिले आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ अशी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. अर्ज दाखल करण्याच्या प्रत्येक ठिकाणी उमेदवारांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. गुरुवारी राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उमेदवारासोबत चारच प्रतिनिधी पाठविले जाणार आहेत. मात्र कार्यालयाबाहेरील गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान असणार आहे.