पूर : सर्व उपाय कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 09:26 PM2020-05-23T21:26:57+5:302020-05-24T00:26:01+5:30
नाशिक : पावसाळ्यात नदीपात्रातील धोका लक्षात आल्यानंतर हा जोखीम कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या खऱ्या परंतु त्यातील जवळपास एकही उपाय प्रत्यक्षात आलेला नाही. नदीप्रवाहाला अडथळा ठरणारे पूल आणि बंधारे कायम आहेत इतकेच नव्हे तर नदीपात्रातील गाळ काढण्याचे कामदेखील झालेले नाही. शहरातील चार प्रमुख नद्यांपैकी गोदावरी नदी सर्वांत मोठी आहे. पात्र छोटे असले तरी पुराचा सर्वाधिक धोका या नदीमुळेच आहे.
नाशिक : पावसाळ्यात नदीपात्रातील धोका लक्षात आल्यानंतर हा जोखीम कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या खऱ्या परंतु त्यातील जवळपास एकही उपाय प्रत्यक्षात आलेला नाही. नदीप्रवाहाला अडथळा ठरणारे पूल आणि बंधारे कायम आहेत इतकेच नव्हे तर नदीपात्रातील गाळ काढण्याचे कामदेखील झालेले नाही. शहरातील चार प्रमुख नद्यांपैकी गोदावरी नदी सर्वांत मोठी आहे. पात्र छोटे असले तरी पुराचा सर्वाधिक धोका या नदीमुळेच आहे.
नासर्डी-वालदेवीपासून तुलनात्मक धोका कमी आहे. वाघाडीला तरी नदीपेक्षा नालाच अधिक मानले जाते. त्यातच गोदावरी बारामाही आहे. २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर शेकडो मिळकती पूररेषेत आल्या. त्यावर मात करण्यासाठी आणि पुराचा वास्तविक धोका कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने केंद्रशासनाच्या एका विभागामार्फत अहवाल तयार करून घेण्यात आला. २०११ मध्ये हा अहवाल महापालिककडे आला. त्यात बºयाच शिफारसी असल्या तरी नदीप्रवाहाला अवरोध होणारे अडथळे हटवावेत ही सूचना होती. त्यात आनंदवलीपासून होळकर पूल असे दोन प्रमुख बंधारे हटविणे अपेक्षित होते. परंतु आनंदवलीचा बंधारा हटला नाही. होळकर पुलाखाली बंधाºयाजवळ अत्यंत जुने गेट आहे, ते हटवून मॅकेनिकल स्वयंचलित गेट बसविण्याचे ठरविण्यात आले. रखडलेले हे काम महापालिका करूच शकली नाही, आता ते स्मार्ट सिटीकडून करून घेण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा मंजूर झाल्यानंतरदेखील अद्याप या कामाला मुहूर्त लागलेला नाही. गंगापूररोडवरील जुन्या पंपिंग स्टेशनजवळ नदीपात्रात महापालिकेने जलवाहिनीच्या कामासाठी कॉफर डॅम (मातीचा बंधारा) बांधला होता. ही सर्व माती ‘जैसे थे’ असून, ती हटवावी अशी सूचना होती. परंतु त्यावरील कार्यवाहीदेखील झालेली नाही. गोदावरीच नव्हे तर नासर्डी नदीवरदेखील अनेक पूल हे कमी उंचीच्या अंतरावर आहेत. त्यामुळे प्रवाहाला अडथळे निर्माण होतात.
पावसाळ्यात पूर आल्यानंतर आंनदवलीपासून पुढे होळकर पूल आणि कन्नमवार पूल वगळता सर्वच पुलांना पाणी लागल्याच्या किंवा पुलावरून पाणी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. नासर्डी नदीवरदेखील सातपूर गाव, आयटीआय आणि उंटवाडी, मिलिंदनगर असे सर्व पूल पाण्याखाली जातात. अशावेळी हे सबमर्सिबल पूल हटवावेत, अशी एक सूचना होती. परंतु त्यावरदेखील कोणताही पूल हटविला गेलेला नाही. (क्रमश:)
-------------
गोदावरी नदीच्या पुरामुळे बुडणारे कमी अंतराचे पूल हटविण्याच्या सूचनेची अंमलबजावणी झाली नाहीच उलट आणखी पूल बांधले जात आहेत. गेल्या दीड वर्षांपासून नदीच्या पलीकडे म्हणजे मखमलाबाद शिवार, हनुमावाडी शिवारात कोणीही नागरी वसाहत नसताना दोन पूल बांधले जात आहेत. त्यातील एका १८ कोटी रुपयांच्या पुलास गेल्या आठवड्यात स्थायी समितीने मान्यता दिली. गोदावरी नदीवर पुलांची संख्या इतकी वाढत आहे की पुलांची नदी म्हणून ओळख निर्माण होऊ शकते, असे काही नागरिकांचे मत आहे.
--------------
त्या गेटला आता पावसाळ्यानंतरच मुहूर्त
अहिल्या देवी होळकर पुलाखालील नवीन गेटच्या कामावरून स्मार्ट सिटी कंपनीत बरीच भवती न भवती झाली. आता त्याचे टेंडर मंजूर होऊनदेखील बरेच दिवस झाले. परंतु काम सुरू झालेले नाही. मेरीकडून संकल्प चित्र मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे आता पावसाळ्यानंतर हे काम सुरू होण्याची शक्यता आहे.