गोदावरीला पूर : दुतोंड्या मारूतीची मुर्ती छातीपर्यंत बुडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 20:16 IST2019-09-25T20:13:53+5:302019-09-25T20:16:41+5:30
होळकर पूलाखालून सुमारे ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी पुढे रामकुंडातून नदीपात्रात प्रवाहित झाले. दुतोंड्या मारूतीची मुर्ती छातीपर्यंत पूराच्या पाण्यात बुडाली. गंगा गोदावरी मंदिर, बाणेश्वर मंदिरासह निळकंठेश्वर व नारोशंकर मंदिराला पाण्याचा वेढा पडला.

गोदावरीला पूर : दुतोंड्या मारूतीची मुर्ती छातीपर्यंत बुडाली
नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी (दि.२५) जोरदार पाऊस झाल्यामुळे सायंकाळी सात वाजता गंगापूरमधून गोदावरी नदीत सुमारे १ हजार १४२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे सायंकाळपासून गोदावरी नदीच्या पातळीत वाढ होण्यास सुरूवात झाली. शहरासह उपनगरीय भागातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी नदीत येऊन मिसळल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होऊन होळकर पूलाखालून सुमारे ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी पुढे रामकुंडातून नदीपात्रात प्रवाहित झाले. दुतोंड्या मारूतीची मुर्ती छातीपर्यंत पूराच्या पाण्यात बुडाली. गंगा गोदावरी मंदिर, बाणेश्वर मंदिरासह निळकंठेश्वर व नारोशंकर मंदिराला पाण्याचा वेढा पडला. रामसेतूला पूराचे पाणी लागले.
गंगापूर धरणाच्या परिसरात सायंकाळपर्यंत १०२ तर पाणलोट क्षेत्रातील कश्यपी परिसरात ८४ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होऊ लागल्याने सायंकाळी सात वाजता धरणातून १ हजार १४२ क्यूसेक इतका विसर्ग नदीपात्रात केला गेला. धरणसाठा ५ हजार ६३० दशलक्ष घनफुटापर्यंत पोहचला असून धरण १०० टक्के भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. तसेच आळंदी धरणातूनही ८६ क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. त्याचप्रमाणे कश्यपीमधून २११ क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरण शंभर टक्के भरले असून रात्री पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास गंगापूर धरणातून विसर्गामध्ये वाढ होऊ शकते, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. गोदावरी नदीच्या काठालगत असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आला आहे. दुतोंड्या मारुतीची मूर्ती कमरेपर्यंत बुडाली होती. गोदावरी नदीच्या पातळीत वाढ होऊ लागल्याने नदीकाठालगतच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना सायंकाळपासून पंचवटी अग्निशमन उपकेंद्राच्या जवानांकडून दिल्या जात होत्या. रामकुंड ते गाडगे महाराज पुलापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून गस्त घालून ध्वनिक्षेपकांद्वारे नागरिकांना सावधानतेच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे नदीच्या प्रवाहात प्रचंड वेग निर्माण झाला.
नासर्डी दुथडी भरून वाहू लागली
सिडको, सातपूर, इंदिरानगर भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे नंदिनी (नासर्डी) नदीला पूर आला. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तिडके कॉलनी भागातील मिलिंदनगर येथील पुलावरून नदीच्या पुराचे पाणी वाहू लागले होते. तसेच रात्री आठ वाजेच्या सुमारास वडाळारोडवरील भारतनगर येथील नासर्डीच्या पुलाला पाणी लागले. या भागातील नैसर्गिक नालेदेखील ओसंडून वाहू लागल्याचे चित्र होते. नासर्डी नदीला पूर आल्याने शिवाजीवाडी, भारतनगर, मिलिंदनगर, पखालरोड आदी नदीकाठालगतच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.