पूरपरिस्थितीचे नियोजन : आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 02:25 PM2020-06-09T14:25:13+5:302020-06-09T14:28:45+5:30
गतवर्षी जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्तीचा सामना जिल्हा प्रशासनाने केला असताना यंदाही जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आपत्ती निवारणासाठीचा कृती आराखडा तयार केला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात तीन ते चारपटीने अधिक पाणीसाठा असल्याने पूरपरिस्थतीचा सामना जिल्हा प्रशासनाला करावा लागण्याची शक्यता आहे.
नाशिक : गतवर्षी सरासरीपेक्षा झालेला विक्रमी पाऊस आणि नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्तीचा सामना जिल्हा प्रशासनाने केला असताना यंदाही जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आपत्ती निवारणासाठीचा कृती आराखडा तयार केला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात तीन ते चारपटीने अधिक पाणीसाठा असल्याने पूरपरिस्थतीचा सामना जिल्हा प्रशासनाला करावा लागण्याची शक्यता आहे.
आपत्ती निवारण कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारण कृती आराखडा तयार करावा लागतो. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असून, तसा लघुकृती आराखडा तयार करून जबबदाºया निश्चित केलेल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा फटका काही प्रमाणात जिल्ह्याला बसला आणि मान्सूनपूर्व पावसापासूनच यंत्रणेच्या कामाला सुरूवात झाली आहे. नुकसानभरपाईचे पंचनामे आणि अहवाल तयार करण्यासाठी यंत्रणा कामालादेखील लागली आहे. यापुढे आणखी आपत्तीच्या प्रसंगासाठी जिल्हा प्रशासनाने जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. यात पाटबंधारे विभाग, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य यंत्रणा, महावितरण, दूरसंचार विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, राज्य परिवहन महामंडळ रेल्वे व्यवस्थापक आणि वनविभागाचा कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आपत्तीची सूचना मिळताच या विभागांना आपल्या कार्यक्षेत्रात करावयाच्या उपाययोजना, सूचना, प्रतिबंधात्मक उपाय, यासाठी सतर्क राहावे लागते. यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांकडे जबाबदारी निश्चित करून समन्वय आणि संपर्क यांचे सातत्य राखून जिल्हा आपत्ती कक्षाकडे माहिती पुरविण्याची महत्त्वाची भूमिका देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात मागीलवर्षी विक्रमी पाऊस झाला आणि धरणांमधून विक्रमी विसर्ग करण्यात आल्याने पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती. यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये दोन वर्षीच्या तुलनेत तीन ते पाच पट अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे दमदार पाऊस झाल्यास पूरपरिस्थिती लवकर उद्भवण्याची शक्यता आहे. गंगापूर धरण समूहात सद्यस्थितीत ३४ टक्के पाणीसाठा आहे. २०१९ मध्ये याच महिन्यात अवघा १२ टक्के इतका पाणीसाठा होता, तर जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये गतवर्षी अवघा ९ टक्के पाणीसाठा असताना यंदा हाच साठा ३१ टक्के इतका असल्याने यंदा धरणामधून लवकरच पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार आहे.