नद्यांना पूर
By admin | Published: July 10, 2016 10:40 PM2016-07-10T22:40:24+5:302016-07-10T22:53:03+5:30
नद्यांना पूर
नाशिक : शहरासह परिसरात शनिवारी सकाळपासून झालेल्या संततधारेने गोदावरीसह वाघाडी, नासर्डी व दारणा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, या नद्यांच्या काठावरील झोपडपट्टीधारक तसेच रहिवाशांना सावधानतेचा इशारा म्हणून तात्पुरते स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. शहरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मुख्य रस्त्यांवर उघड्यावर बसणारे व्यावसायिक तसेच विविध चौकांमध्ये व रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना त्याचा फटका बसला. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांचीही अडचण झाली.
मोकळे भूखंड झाले जलमय
पंचवटी परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहने अडकून पडली होती. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या काही टपऱ्या वाहून गेल्या. शनिवारी सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारीही कायम असल्याने याचा सर्वाधिक फटका व्यावसायिकांना बसला आहे. तसेच रामकुंड परिसरात नदीकाठी असलेल्या काही दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. पावसामुळे मुख्य रस्ते तसेच मोकळे भूखंड जलमय झाले. या संततधारेमुळे वाघाडी नाला व गोदावरीला पूर आल्याने नागरिकांनी पूर बघण्यासाठी गर्दी केली होती.
कॉलनी रस्त्यांची लागली वाट
गंगापूररोड परिसरातील विविध कॉलनी परिसरात पाणी साचल्याचे चित्र होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अनेक चेंबर्स क्षमतेपेक्षा अधिक वाहत होते. अनेक ठिकाणी चेंबरमधील मैलायुक्त पाणी बाहेर पडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गंगापूररोडप्रमाणेच सातपूर, कामटवाडे परिसरातही अंतर्गत कॉलनी रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे. कामटवाडे परिसरातील अंबिकानगर परिसरातही गुडघाभर पाणी साचले असून, या परिसरातील लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या भागाकडे पाठ फिरवली असून, गेल्या कित्येक वर्षांपासून या परिसरात नवीन रस्तेदेखील बांधण्यात आले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. काही महिन्यांपूर्वी याठिकाणी भूमिगत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम झाले असले तरी या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांनी या परिसरात अधिकच चिखल झाला असून, गाडी स्लिप होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सकाळी चिखल तसेच साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वृत्तपत्रविक्रेता घसरून पडण्याची घटना घडली आहे. या सखल भागात तब्बल गुडघाभर पाणी असल्याने पायी चालणे मुश्किल झाले असून, दुचाकी वाहनांच्या इंजिनमध्येही पाणी जाऊन ही वाहने नादुरुस्त होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही हाल होत असून, तातडीने तात्पुरत्या स्वरूपात का होईना रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
जागोजागी पाणी तुंबले
नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प भागात भूमिगत गटारींमध्ये कचरा अडकल्याने सर्वत्र पावसाचे पाणी तुंबले होते. त्यामुळे नागरिकांनी फावडे, कुदळ आदि सामान घेऊन चेंबरचे झाकण उघडे करण्यासाठी प्रयत्न केले. रस्त्यावर व काही सखल भागात घरे व झोपड्यांत पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. नाशिकरोड भागात रविवारी दिवसभर व सायंकाळी विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे सर्व अंधाराचे साम्राज्य होते.
कंपन्यांसमोर गुडघाभर पाणी
सातपूरच्या त्रंबकरोडवर पपया नर्सरी, अंबड-सातपूर लिंकरोडवर आझाद चौक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा सर्कल, मायको सर्कल कंपनीसमोर गुडघाभर पाणी साचले होते. तसेच एबीबी सर्कल, श्रीराम चौक, सातपूर कॉलनी भागात अनेक चौकात पाणी साचल्याने रस्ते जलमय होऊन वाहतूक खोळंबली होती. नासर्डी नाल्याला पूर आल्याने आयटीआयनजीकच्या झोपड्या पाण्याखाली गेल्या होत्या. सातपूर कॉलनीतील श्रीकृष्णनगर, आनंदवली, नवश्या गणपती आदि ठिकाणच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. काही ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत पुरवली. नासर्डी नदीला पूर आल्याने नदीच्या किनाऱ्यावरील रहिवाशांना फटका बसला. नदीकाठावरील झोपडपट्टीवासीयांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. नदीला पूर आल्याने काठावरील राहिवाशांची धावपळ उडाली (लोकमत चमू)