नदीला येता पूर, चर्चांना महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 01:09 AM2019-12-14T01:09:52+5:302019-12-14T01:10:09+5:30
पाऊस नसतानाही येथील शाकंबरी नदीला अचानक पूर आल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१३) पहावयास मिळाला. नदीला आलेले एवढे पाणी नेमके कोठून आले या प्रश्नाचे उत्तर सायंकाळपर्यंत न मिळाल्याने पुराच्या पाण्याचे रहस्य दिवसभर नांदगाववासीयात कोडेच बनून राहिले.
नांदगाव : पाऊस नसतानाही येथील शाकंबरी नदीला अचानक पूर आल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१३) पहावयास मिळाला. नदीला आलेले एवढे पाणी नेमके कोठून आले या प्रश्नाचे उत्तर सायंकाळपर्यंत न मिळाल्याने पुराच्या पाण्याचे रहस्य दिवसभर नांदगाववासीयात कोडेच बनून राहिले.
नदीला पूर आल्याची बातमी सोशल मीडियातून व्हायरल झाली. त्यानंतर पूरपाण्याचे व्हिडीओ फिरू लागले. तास-दीड तासानंतर पाण्याचा जोर ओसरला; पण अचानक पूर कसा, याची चर्चा दिवसभर सुरू होती. पूर पाहण्यासाठी नागरिकांनी नदीकडे धाव घेऊन ‘याची देही, याची डोळा’ अनुभव घेतला. या संदर्भात जलसंपदा विभागाकडून निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. शाकंबरी नदीला येऊन मिळणाऱ्या नाल्यांवर केटी प्रकारचे बंधारे आहेत. बंधाºयाच्या फळ्या काढून घेतल्या तर जोराने पाणी शाकंबरी पात्रात येण्याची शक्यता आहे. यंदा सर्व बंधारे भरले आहेत. बंधारा फुटला असेल किंवा एखाद्या ठिकाणी गळती लागली असल्यास शाकंबरी पात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केलीे. मात्र, वाहत असलेल्या पाण्याबाबत बंधारा परिसरातील गावांकडून गळतीबाबत दुजोरा मिळाला नाही. मात्र पूर कसा आला हा प्रश्न शुक्रवारी सायंकाळपर्यंत तरी अनुत्तरीतच राहिला.