उड्डाणपूल : असून अडचण, नसून खोळंबा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:14 PM2018-09-26T23:14:44+5:302018-09-27T00:14:00+5:30
नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने पुन्हा एकदा वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून, सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर दरम्यानच्या भुयारी मार्गासाठी उड्डाणपुलावरील एकतर्फी वळविलेली वाहतूक व के. के. वाघ ते जत्रा हॉटेल दरम्यान उड्डाणपुलाचे सुरू झालेल्या विस्तारीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे.
नाशिक : नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने पुन्हा एकदा वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून, सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर दरम्यानच्या भुयारी मार्गासाठी उड्डाणपुलावरील एकतर्फी वळविलेली वाहतूक व के. के. वाघ ते जत्रा हॉटेल दरम्यान उड्डाणपुलाचे सुरू झालेल्या विस्तारीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. या दोन्ही कामांसाठी बराच कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत महामार्गावरील वाहतूक कोंडी म्हणजे उड्डाणपूल असून अडचण, नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण होणार आहे.
तीन आठवड्यांपूर्वी कमोदनगरकडून सुंदरबन कॉलनीकडे उड्डाणपुलावरून जात असताना भरधाव येणाºया वाहनाच्या धडकेत दोघे मायलेक ठार झाले होते. तेव्हापासून उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर निदर्शनास आलेल्या वाहतूक त्रुटींची अधिक चर्चा होऊन प्रलंबित कामांचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींकडून सुरू झाला. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या के. के. वाघ ते हॉटेल जत्रा दरम्यान उड्डाणपुलाच्या विस्तारीकरण करण्याच्या कामालाही राष्टय
महामार्ग प्राधिकरणाने सुरुवात
केली असून, सिडकोतील लेखानगर येथे यू-टर्नच्या कामालाही येत्या आठवड्यात सुरुवात केली जाणार असल्याने त्या दृष्टीने तयारीला सुरुवात झाली आहे. उड्डाणपुलावर व पुलाखाली सुरू होणा-या या कामामुळे आत्तापासूनच वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
विल्होळी भुयारी मार्गाचे काम प्रगतिपथावर
नाशिक महापालिका हद्दीला लागून असलेल्या महामार्गावरील विल्होळी येथेही भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू असून, मध्यंतरी पावसाळ्यामुळे दोन महिने मंदावलेला कामाचा वेग आता वाढला आहे. दहा वर्षांपासून या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती; परंतु राष्टय महामार्ग प्राधिकरणाने काम मंजुरीस विलंब केल्यामुळे काम सुरू होऊ शकले नव्हते. सहा महिन्यांपासून भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने याठिकाणीही वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे.
भुयारी मार्गासाठी उड्डाणपुलावर एकेरी वाहतूक
उड्डाणपूल ओलांडताना दोघांचे बळी गेल्यामुळे उड्डाणपुलाखालून सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर जोडणाºया भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. सिडकोकडील भागात सुंदरबन कॉलनीच्या तोंडाशी सुरू असलेल्या या कामासाठी जवळपास वीस ते पंचवीस फूट खोल खड्डा खणण्याचे काम यंत्राच्या साहाय्याने सुरू असून, त्याच बाजूने उड्डाणपुलाला या कामामुळे धोका पोहोचू नये यासाठी उड्डाणपुलावरून धुळ्याकडे जाणाºया वाहतुकीत बदल करून ती एकतर्फी करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे जाणाºया वाहनांसाठी एकेरी मार्गाचा वापर करावा लागत आहे. परिणामी या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होत असून, त्यातही जर अवजड वाहने असतील तर त्यांचा वेग पाहता उड्डाणपुलावर लांबच लांब रांगा लागत आहेत.
लेखानगर यू-टर्नचे काम लवकरच
सिडकोतील पेठेनगर-लेखानगर या दोन्ही भागांना जोडण्यासाठी उड्डाणपुलाखाली यू-टर्नचे काम हाती घेण्यासही राष्टय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली असून, त्यामुळे इंदिरानगर बोगद्यात वाहनांची होणारी कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. सदरचे काम गेल्या वर्षीच मंजूर करण्यात आले असले तरी, लेखानगर येथे स्थानिक रहिवासी व काही राजकीय व्यक्तींच्या दबावापोटी काम सुरू केले जात नव्हते. आता मात्र सुंदरबन कॉलनी येथे भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्याने राष्टय महामार्ग प्राधिकरणाने लेखानगर येथे यू-टर्नचे काम सुरू करण्याचे ठरविले असून, त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.