फुलशेती करणारे शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 06:51 PM2021-03-06T18:51:55+5:302021-03-06T18:52:26+5:30
कवडदरा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेती व्यवसायसुद्धा होरपळून जात आहे. त्यातही फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थितीतर अधिकच बिकट होत असून इगतपुरी तालुक्यातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.
कवडदरा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेती व्यवसायसुद्धा होरपळून जात आहे. त्यातही फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थितीतर अधिकच बिकट होत असून इगतपुरी तालुक्यातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.
शेणित, साकूर, भरवीर, बेलू परीसरातील तसेच ग्रामीण भागातील यात्रा, उत्सव कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत असल्याने बंद आहेत, यामुळे फुलांची मागणी घटली आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.
नेहमी घेतल्या जाणाऱ्या पिकाची लागवड न करता उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने साकूर परीसरातील काही शेतकऱ्यांनी फुलशेती करण्याचा विचार केला. शेतात एका एकरामध्ये झेंडू, शेवंती, लिली अशा अनेक फुलांची लागवड केली. वेगवेगळे कार्यक्रम, समारंभांमध्ये फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे त्याने हा पर्याय निवडला. मात्र, फुलांची विक्री करण्याची वेळ आली, तेव्हा कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं. कोरोना प्रतिबंधक नियम अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. याचा परिणाम फुलशेतीवर होत आहे.
परिणामी फुलांना बाजारामध्ये म्हणावा तसा भाव मिळत नाहीये. शेतीमध्ये नवनवीन पिकं घेऊन काहीतरी वेगळं करु पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती यामुळे निराशा आली आहे. फुलांना बाजारात मागणीच नसल्यामुळे शेतातील फुलं जागेवर सडून जातायत.काही प्रमाणात फुलं विकली गेली, तरी म्हणावा तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झो आहेत.
शेतकऱ्यांना आर्थिक फटका
वाढत्या कोरोनाच्या अफवेमुळे फुल बाजारात जात नाहीत. शेवंती, झेंडू लिली या फुलांची मी लागवड केली आहे. मात्र बाजारात भाव नसल्यामुळे तसेच ग्रामीण भागातील यात्रा, उत्सव बंद असल्याने प्रचंड नुकसान होत आहे. दरम्यान, कोरोनामुळे अचानक ओढवलेल्या या संकटामुळे फुलशेती करणारे शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतात फुलं असूनही त्यांना बाजारात रास्त भाव मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
- सचिन जाधव, शेतकरी, साकूर.