सहामाही परीक्षेवर यंदाही शिक्षण विभागाची फुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 01:56 AM2021-10-20T01:56:26+5:302021-10-20T01:57:28+5:30
काेरोनाची दुसरी लाट व तिसऱ्या लाटेची संभाव्य भीती लक्षात घेता शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण न होऊ शकल्याने दिवाळीपूर्वी घेण्यात येणारी सहामाही परीक्षा यंदाही न घेण्याच्या निष्कर्षाप्रत शिक्षण विभाग आला आहे.
नाशिक : काेरोनाची दुसरी लाट व तिसऱ्या लाटेची संभाव्य भीती लक्षात घेता शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण न होऊ शकल्याने दिवाळीपूर्वी घेण्यात येणारी सहामाही परीक्षा यंदाही न घेण्याच्या निष्कर्षाप्रत शिक्षण विभाग आला आहे. सहामाही परीक्षेऐवजी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सेतू अभ्यासक्रमावर तीन घटक चाचण्या घेऊनच विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे शिक्षकांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. जून महिन्यात शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनी सहामाही व दुसऱ्या सत्रात वार्षिक परीक्षा घेण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन असले, तरी गेल्या वर्षी कोरोनाच्या शिरकाव्यामुळे मार्च, एप्रिलमध्ये होणारी वार्षिक परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविण्यात आले. त्यामुळे चालू वर्षी जून महिन्यात तरी शाळा सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना जून महिन्यात कोरोनाची दुसरी लाट कायम राहिली. त्यातच तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात आल्याने शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा रुग्ण नसलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात विद्यार्थ्यांची शाळेशी असलेली नाळ गेल्या दीड वर्षापासून तुटल्यामुळे त्यांना पुन्हा शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने सेतू अभ्यासक्रम तयार केला. दीड महिन्यात सेतू अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांची पुन्हा उजळणी घेण्यात आली. अलीकडेच हा अभ्यासक्रम शिक्षकांनी संपवून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली आहे. चालू महिन्यापासून नियमित अभ्यासक्रमाला सुरुवात झाली असली, तरी पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम अद्याप पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा घेणे उचित होणार नसल्याने दिवाळीपूर्वी होणारी सहामाही परीक्षा न घेण्याच्या निष्कर्षाप्रत शिक्षण विभाग आला असून, सहामाही परीक्षा घ्यावी की नाही? याबाबत कोणतेही आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले नाहीत. मात्र, सेतू अभ्यासक्रमावर आधारित विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी जाणून घेण्यासाठी तीन घटक चाचण्या घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार घटक चाचण्या सध्या सुरू असल्याचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी सांगितले.