फुलांनी उत्पादक शेतकऱ्यांना दिला आर्थिक आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 11:32 PM2020-10-25T23:32:30+5:302020-10-26T01:03:11+5:30
नायगाव : गेल्या काही दिवसांपासून मातीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या फुलांनी यंदा मात्र उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक आधार दिला आहे. अती पावसामुळे फुलांचे एकरी उत्पन्न घटल्यामुळे नवरात्रीत व दसऱ्याला चांगला दर मिळाल्याने उत्पादक बळीराजाच्या मातीतुन फुलांचा सुगंध दरवळला आहे.
नायगाव : गेल्या काही दिवसांपासून मातीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या फुलांनी यंदा मात्र उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक आधार दिला आहे. अती पावसामुळे फुलांचे एकरी उत्पन्न घटल्यामुळे नवरात्रीत व दसऱ्याला चांगला दर मिळाल्याने उत्पादक बळीराजाच्या मातीतुन फुलांचा सुगंध दरवळला आहे. नवरात्री, दसरा व दिवाळीत शेतकऱ्यांना हमखास आर्थिक आधार देणाऱ्या फुल शेतीला गेल्या दोन वर्षांपासून कधी अवकाळी तर कधी मातीमोल भावामुळे आर्थिक फटका बसत आहे. यंदाही अती पावसामुळे मोठ्या प्रमाणात फुल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते.
बदलत्या हवामान व पावसामुळे फुलांचे एकरी उत्पादन घटल्याने बाजारात फुलांची आवक घटुन मागणी वाढली. अशा परस्थितीतुन वाचलेल्या फुलांना नवरात्रीत चांगला भाव मिळाला होता. दसऱ्यामुळे बाजारात फुलांना मागणी वाढली. मात्र आवक घटल्यामुळे भावातही मोठी वाढ बघायला मिळाली. नवरात्रीत ४० ते ५० रुपये किलोने विकलेल्या झेंडुला रिववारी दिडशे ते दोनशे रुपये प्रति किलो दर मिळाला. दुपार नंतर तर बाजारात फुलांची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
चौकट...
गेल्या चार-पाच वर्षांचा विचार करता यंदा फुल लागवडीचे क्षेत्र लाँकडाऊनमुळे घटले आहे. अल्प लागवड होऊन पावसामुळे फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून यंदा प्रथमच फुलांचे दर शंभरीपार गेले आहे. वाढीव भावाचा फायदा हा कमी शेतकऱ्यांना झाला आहे. घटलेली आवक व वाढती मागणी लक्षात घेता दसऱ्या प्रमाणेच दिवाळीतही फुले भाव खाणार असे चित्र आहे.
- गणेश कांगणे. फउल उत्पादक, दोनवाडे.
मी गेल्या सात वर्षांपासून फुलशेती करत आहे. आजपर्यंत एकदा ही असा भाव मिळाला नाही मात्र यंदा फुलांना योग्य दर मिळाला असला तरी बदलत्या हवामानाबरोबर पावसामुळे उत्पादन घटल्याने अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. असाच भाव दिवाळीत मिळण्याची आशा आहे.
- ज्ञानेश्वर दिघोळे. फुल उत्पादक. जायगाव.