उड्डाणपुलावरील चढ-उताराचे मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 07:36 PM2021-03-11T19:36:18+5:302021-03-11T19:39:46+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीवरील नव्यानेच बांधलेला उड्डाण पूल सुरू झाला असला तरी पुलावर चढण्यास व उतरण्याचे मार्ग काही दिवसांपासून बंद केले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तीन कि.मी.चा हेलपाटा मारावा लागत असून वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

महामार्गावरील चढण्याचा व उतरण्याचे पर्यायी मार्ग बंद केल्याने खासदार भारती पवार यांनी स्वतः अनुभव घेत टोल प्रशासनाला धारेवर धरत लवकरात लवकर सदरचे रस्ते मोकळे करून देण्याच्या सुचना केल्या होत्या. आमदार दिलीप बनकर यांनीही याबाबतीत टोल प्रशासनाला जाब विचारला होता. दोन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यावरही अद्याप पर्यंत टोल प्रशासनाने रस्ते मोकळे केले नाहीत. दोन महिन्यापासुन रस्ता बंदच असुन त्यासंबंधी कुठेही साधा फलक सुद्धा लावण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनधारकास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जाऊन हेलपाटा मारत मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर अंधार
पिंपळगाव बसवंत शहरातील महामार्गावरील मुख्य चौफुलीवरील सर्वच पथदीप बंद आहेत. तसेच पिंपळगाव बसवंत टोल प्रशासनाचे चिंचखेड, उबरखेडसह अनेक ठिकाणी लावण्यात आलेले पथदीप गेल्या दोन महिन्यांपासुन बंद अवस्थेत आहेत. रात्रीच्या वेळेस महामार्गावरील भुयारी मार्ग हा पुर्णपणे अंधारात असल्याने पादचारींना रस्ता ओलांडून जातांना भिती निर्माण होत आहे. त्यामुळे नागरीक नाराजी व्यक्त करीत आहेत.