आशापूर येथे विद्युत वाहक तारांच्या घर्षणाने चारा खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 06:52 PM2019-04-24T18:52:28+5:302019-04-24T18:53:37+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील आशापुर (टेंभुरवाडी ) येथे विघुत वाहक तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडल्याने शेतातील चारा जळून खाक झाल्याची घटना बुधवार (दि.२४) रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
आशापूर येथील गट नंबर १५६९ हे प्रसाद बन्सी पाटोळे यांच्या मालकीचे असून त्यांनी आपल्या या गटात जनावरांना बांधण्यासाठी झाप व गोठा बांधलेला आहे. शेजारीच त्यांनी ५०० गवताच्या पेंड्या, एक ट्रॅक्टर तणस, तर ५०० कडब्याच पेंड्या विकत आणून साठवून ठेवला होता. सदरच्या गटनंबर मधून वीज वितरण कंपनीची तारा गेलेल्या आहेत. बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्या तारेवर कावळे बसल्याने तारेमध्ये घर्षण होऊन गवताच्या सुडीवर त्याची ठिणगी पडल्याने गवतास आग लागली. गवत वाळलेले असल्याने आग वाढतच गेली. गावापासून काही हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी आग पाहताच ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शेताकडे धाव घेतली. आग वाढतच गेल्याने पाटोळे यांचे संपूर्ण गवत जळून खाक झाले. ग्रामस्थांनी धावपळ करत गवताशेजारीच बांधलेले दोन बैल, गाय व वासरु सोडून अन्य ठिकाणी हलविले त्यामुळे जीवित हानी झाली नाही. पाटोळे यांचे अंदाजे तीस हजाराचे नुकसान झाले आहे. तलाठी वाय. आर. गावित यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.